ऊसतोड कामगाराचा मुलगा उपमहापौर झाल्याबद्दल पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आनंद  - Pankaja Munde is happy that the son of a sugarcane worker has become the Deputy Mayor | Politics Marathi News - Sarkarnama

ऊसतोड कामगाराचा मुलगा उपमहापौर झाल्याबद्दल पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आनंद 

उत्तम कुटे
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

भाजपच्या तीनही महापौरांनासुद्धा हे भाग्य लाभलेले नाही.

पिंपरी : ऊसतोड कामगाराचा मुलगा (केशव घोळवे) श्रीमंत पिंपरी-चिंचवडचा उपमहापौर झाल्याबद्दल ऊसतोड कामगारांच्या नेत्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज (ता. 7 नोव्हेंबर) आनंद व्यक्त केला. घोळवे यांना मुंबईत बोलावून त्यांचा मुंडे यांनी खास सत्कार केला. 

दरम्यान, शहरात प्रथमच सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचा (उपमहापौर) पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने असा विशेष सत्कार केल्याची ही गेल्या चार वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत शहरात झालेल्या भाजपच्या तीनही महापौरांनासुद्धा हे भाग्य लाभलेले नाही. दरम्यान, या सत्कारातून ताकद मिळाल्याने भाजपच्या जुन्या एकनिष्ठ गटाला मोठे बळ मिळाले आहे. 

घोळवे हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. ते शहरातील जुने एकनिष्ठ भाजपाई आहेत. त्यांची परवा उपमहापौर म्हणून बिनविरोध झाली आणि लगेच त्यांना काल पंकजा यांनी मुंबईत येण्याचा निरोप पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांच्याकडे दिला. त्यानुसार घोळवे, खाडे, अशोक मुंडे, डॉ. रवी खेडकर हे दुपारी वरळी, मुंबई येथील पंकजांच्या कार्यालयात गेले. 

तेथे घोळवे यांना पेढा भरवून पुष्पगुच्छ देत पंकजांनी सत्कार केला. त्यांच्या पाठी खंबीर उभे राहू, असे आश्वासनही दिले. "अडचण आली, तर कधीही या,' असेही त्यांनी आश्वस्त केले. ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांच्यासाठी तुम्ही वाली आणि वारी बना हे गोपीनाथ मुंडे यांचे वचनही त्यांनी ऐकवले. 

बहुजन आणि उपेक्षित वर्गाला मुख्य प्रवाहात आणा, त्यांची गाऱ्हाणी समजावून घ्या, असा मंत्र त्यांनी घोळवे यांना दिला. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख