पंकजा मुंडेच आमचा पक्ष; त्यांच्या आदेशानुसार राजीनामा मागे घेणार - Pankaja Munde gave the order And office bearers withdrew their resignations | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पंकजा मुंडेच आमचा पक्ष; त्यांच्या आदेशानुसार राजीनामा मागे घेणार

उत्तम कुटे 
मंगळवार, 13 जुलै 2021

या वेळी स्थानिक पक्षप्रमुख आता आपल्यावर डूख धरतील, अशी भीती बीड जिल्ह्याबाहेरील राजीनामा दिलेल्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

पिंपरी  ः आमचा पक्षच पंकजाताई मुंडे आहे. त्यांचा आदेश अंतिम. तो आम्ही पाळणार आहे, असे सांगत राजीनामा दिलेले पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी तो मागे घेत असल्याचे ‘सरकारनामा’ला मंगळवारी (ता. १३ जुलै) सांगितले. दिल्लीहून परत येताच पंकजा यांनी लगेचच मुंबईत राजीनामा दिलेल्या बीड, नगर व पिंपरी-चिंचवडच्या ३६ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे राजीनामे नामंजूर करीत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तेथे हजर असलेल्या कायंदे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Pankaja Munde gave the order And office bearers withdrew their resignations)

दिल्लीहून मुंबईत परतताच वरळी येथील मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात पंकजा यांना भेटण्यासाठी राजीनामा दिलेल्यांसह राज्यभरातील त्यांचे कट्टर समर्थकही मोठ्या संख्येने आले होते. त्यात पिंपरी-चिंचवडमधील माजी उपमहापौर केशव घोळवे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींचा समावेश होता. पंकजांनी प्रथम जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी स्थानिक पक्षप्रमुख आता आपल्यावर डूख धरतील, अशी भीती बीड जिल्ह्याबाहेरील राजीनामा दिलेल्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यावर असे काहीही होणार नाही, असे त्यांना आश्वस्त करण्यात आले. 

हेही वाचा : केंद्रीय मंत्रीपद मी तेव्हाच नाकारले : पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

या अनौपचारिक संवादानंतर पंकजांनी बाहेर येत सर्वांशी माईकवरून थेट संवाद साधला. राजीनामा मी नामंजूर करणे तथा तो तुम्ही मागे घेणे हा स्वल्पविराम असून तो पूर्णविराम नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी या वेळी केले. मंत्रिपदासाठी तुम्हाला मी राजीनामा द्यायला लावेल का अशी विचारणा त्यांनी केली. आपलं घर आपण का सोडायचं असंही त्या म्हणाल्या. दबाव तंत्रासाठी ही जागा छोटी असून त्याकरता मोठी जागा लागेल, असे त्या म्हणताच उपस्थितांमधून मोठा प्रतिसाद आला. 

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता दबाब आणून काय मिळणार आहे का, अशी समजूतही त्यांनी नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची घालण्याचा प्रयत्न केला.त्यावर किती दिवस सहन करायचे, असा एका पदाधिकाऱ्याने विचारले. या वेळी पंकजांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनाम्याचे सत्र सुरु केले होते. बीड, नगरनंतर हे लोण पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडपर्यंत आले होते. मात्र, पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिलेल्यांचा निर्णय बदलूही शकतो, असे पिंपरी-चिंचवड भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ऋषीकेश रासकर यांनी कालच सरकारनामाला सांगितले होते. घडलेही अगदी तसेच. 

दरम्यान, हे राजीनामानाट्य व त्यावरील आजच्या घडामोडीनंतर शहरातील पक्षाचे ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शहराध्यक्षांच्या परवानगीने खास संवाद साधणार आहे, असे रासकर यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख