संतापजनक : पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये बेड मिळवून देण्यासाठी घेतले एक लाख रुपये - One lakh rupees was taken to get a bed in the Corona Center of the municipality | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

संतापजनक : पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये बेड मिळवून देण्यासाठी घेतले एक लाख रुपये

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे बेडसाठी वेटिंग असल्याचे या सेंटरमध्ये सर्वसामान्यांना सांगितले जात होते. मात्र, खासगी रुग्णालयातील रुग्णांना पैसे घेऊन बेड दिला जात होता.

पिंपरी : मोफत आयसीयू बेडसाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये उकळल्याचा वैद्यकीय पेशातील कट प्रॅक्टिसचा धक्कादायक प्रकार पिंपरी महानगरपालिकेच्या ऑटोक्लस्टर कोवीड सेंटरमध्ये घडला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे बेडसाठी वेटिंग असल्याचे या सेंटरमध्ये सर्वसामान्यांना सांगितले जात होते. मात्र, खासगी रुग्णालयातील रुग्णांना पैसे घेऊन बेड दिला जात होता.

संतापजनक बाब म्हणजे हे सेंटर व ते चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलशी अर्थपूर्ण संबध असलेल्या पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे संतापजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतर तडजोडीचा प्रयत्न सुरु केल्याचे समजले आहे. कोरोना झालेल्या पालिका शाळेतील मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून हे पैसे घेण्यात आले. त्यांचा विद्यार्थी असलेले भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्यामुळे हा भंडाफोड झाला. त्यांना भाजपचे दुसरे नगरसेवक विकास डोळस यांची मदत झाली. 

त्यांनी हे पैसे घेणारा या सेंटरचा व त्यांच्याकडे पेशंट पाठवणारा वाल्हेकरवाडीच्या खासगी रुग्णालयाचा अशा दोन्ही डॉक्टरांना प्रसाद दिला. त्यानंतर कमिशनसाठी या सेंटरमध्ये सदर रुग्ण पाठविलेल्या वाल्हेकरवाडीतील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने आपला गुन्हा कबूल केला. एक लाखातील वीस हजार रुपये ठेवून ऐंशी हजार रुपये सेंटरच्या डॉक्टरांना दिल्याचे त्याने कबूल केले. ते गायकवाड यांनी चित्रित केले आहे.

लस कंपन्यांना एका चेकने २५०० ते ३००० कोटी रुपयांची रक्कम देऊ...पण?

काही दिवसांपूर्वी (ता.१९) भाजपचेच शहरातील तिसरे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी वेटिंग असल्याचे सांगणाऱ्या या कोवीड सेंटरचे स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा तेथे पन्नास बेड रिकामे असल्याचे आढळले होते. तर, हे सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलने गेल्यावर्षी भोसरीत सुरु केलेल्या दोन सेंटरमध्ये एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता पालिकेकडून सव्वादोन कोटी रुपये उकळलेले आहेत. त्याप्रकरणी चौकशी सुरु असून एका अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई झाली आहे. या प्रकरणात एका नगरसेविकेचेही नाव समोर आले होते. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

दरम्यान, याप्रकरणी या कोरोना केअर सेंटरचे संचालक डॉ. अमोल हाळकुंदे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन घेतला नाही. तर, या सेंटरचे समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. हे प्रकरण आजच्या पालिका सभेत उपस्थित करणार आहे, असे गायकवाड यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का? शेळकेंच जशास तसे उत्तर

ते म्हणाले, मी स्वत डॉ. हाळकुंदेंना २४ एप्रिलला फोन केला, तेव्हा त्यांनी आयसीयू बेडसाठी वेटिंग असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी माझ्या मुख्याध्यापिका राहिलेल्यां नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेत हा बेड दिला. दरम्यान, काल बुधवारी (ता.२८) या मुख्याध्यापिका रुग्णाचे या सेंटरमध्येच निधन झाले. त्यानंतर काल (ता.२९) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे गायकवाड यांनी लेखी तक्रार करून या प्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. 

तर, भाजपच्याच सेवानिवृत्त शिक्षिका नगरसेविका अनुराधा गोरखे यांनीही या सेंटरचे व्यवस्थापन तातडीने बदलण्याची मागणी आयुक्तांकडे आज केली. या सेंटरविरुद्ध माझ्यासह इतर नगरसेवकांकडेही तक्रारी आल्याचे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या प्रभागातील एक महिला या सेंटरमध्ये दाखल असताना तिचे मंगळसूत्रच चोरण्यात आले होते, याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता आयुक्त काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख