मोठी बातमी : दुर्बल घटकांना सरकारकडून दीड हजार, तर पालिकेकडून तीन हजार रुपयांची मदत...

पन्नास हजार कष्टकऱ्यांना पालिकेच्या या १५ कोटी अर्थसहाय्याचा लाभ होणार आहे.
मोठी बातमी : दुर्बल घटकांना सरकारकडून दीड हजार, तर पालिकेकडून तीन हजार रुपयांची मदत...
33017_44.jpg

पिंपरी : दुसऱ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने दुर्बल घटकांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिन्याची मदत नुकतीत  जाहीर केली. तर, भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड या श्रीमंत महापालिकेने या घटकातील प्रत्येकाला तीन हजार रुपयांचे सहाय्य जाहीर करीत महाविकास आघाडी सरकारवर वरकडी केली आहे. शहरातील पन्नास हजार कष्टकऱ्यांना पालिकेच्या या १५ कोटी अर्थसहाय्याचा लाभ होणार आहे.

अशी स्वतंत्र मदत करणारी पिंपरी ही राज्यातील पहिलीच पालिका ठरली आहे. मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये गेल्यावर्षी पालिकेसह राज्य सरकारकडून हा घटक आर्थिक मदतीपासून वंचित राहिला होता. मात्र, पालिकेची निवडणूक दहा महिन्यावर आल्याने आता दुसऱ्या लॉकडाउनमध्ये या घटकाला खूष करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. पण नोंदणीकृत असणाऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर आदी आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना ती दिली जाणार आहे.

कोविड संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या आर्थिक दुर्बल घटकावर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दिलासा देण्याची मागणी शहराचे कारभारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी  केली होती. त्याची तातडीने दखल घेण्यात आली. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत मदतीचा हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. सात हजार पन्नास रेमडीसिव्हीर इंजेक्शन खरेदी करण्याचा विषयही स्थायीने मंजूर केला.

Edited by: Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in