सायबर हल्लाप्रकरणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस 
pcmc.jpg

सायबर हल्लाप्रकरणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस 

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी सर्व्हरव सायबर हल्ला प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी सर्व्हरव सायबर हल्ला प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी नोटीस पिंपरी पालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला नुकतीच (ता.१८ मार्च) बजावली. यामुळे या हल्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या कंपनीने केलेल्या दाव्याचे ते स्पष्टीकरण कसे देतात याकडे लक्ष लागले आहे. 


नगरसेविका सीमा सावळे यांनी याबाबत कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी त्याची दखल घेत ही कार्यवाही केली. दुसरीकडे या घटनेला १५ दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आलेला नाही. तसेच कंपनीनेही समाधानकारक खुलासा पालिकेकडे केलेला नाही. परिणामी या हल्यामागील संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे. ते निवळावे व आरोपांचेही निराकरण व्हावे यासाठी आयुक्तांनी नोटीस देत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले आहे. 

रँसमवेअर हल्याचे मूळ कारण काय, कंपनीचे काय निरीक्षण आहे, आगामी काळात याचे काय परिणाम होणार, पुन्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर कशी येणार, स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी किती विलंब होणार, आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली आहे. याचा अहवाल तीन दिवसांत देण्यास आयुक्तांनी कंपनीला या नोटीशीव्दारे सांगितले आहे. 

या सायबर हल्ल्याच्या आडून पाच कोटींचे नुकसान झाल्याचा बनाव करुन विमा घेण्याचा डाव आखल्याची शंका सावळे यांनी व्यक्त केली होती. या मुद्दयाची दखल घेत आयुक्तांनी या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचाही तपशिल कंपनीकडून मागविला आहे.  हल्ल्याव्दारे करारातील अटीशर्तींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, अशीही तंबी आयुक्तांनी दिली आहे.  
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in