पिंपरी : उत्तरप्रदेशातील एका पन्नास वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेचा आणि यूपीचे मुख्यममंत्री योगी आदित्यनाथ यांचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादीने घंटानाद करुन शनिवारी निषेध केला.
''आग लगी है बस्तीमे, योगी अपने मस्ती मे, अजय बिश्ट की सरकार, प्रति दिन हो रहे है अत्याचार'' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनानंतर महिलांनी योगींच्या निषेधाचे पत्र टपाल कार्यालयातून पाठवून दिले.
महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या देशातील घटनांपैकी पंधरा टक्के घटना ह्या यूपीत होत असल्याने तेथील मुख्यमंत्र्यांनी ‘योगी’ नाव लावण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे, असा हल्लाबोल या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केला.
नुकतीच यूपीतील बदायू जिल्ह्यात आंगणवाडी सेविकेवर नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन तिची निर्घ्रृणपणे हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी महिला राष्ट्रवादीने शहराच्या पोस्ट ऑफीस समोर थाळीनाद केला.
काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ तसेच संगिता कोकणे, निर्मला माने, सुप्रिया भिंगारे, सविता धुमाळ, स्वप्नाली आसोले, पौर्णिमा पालेकर, पल्लवी पांढरे, मंगल ढगे, विजया काटे, कविता आल्हाट, संगिता आहेर आदींनी सहभाग घेतला.
यावेळी काळभोर म्हणाल्या, या निंदनीय घटनेनंतर उत्तर प्रदेश महिला आयोगाने जी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती महिला भगिनींच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारी आहे. असे अत्याचार करणाऱ्यांना त्यामुळे पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे या आयोगाचा देखील आम्ही निषेध करतो. यूपीतील वाढत्या लैंगिक अत्यचाराच्या घटनांमुळे ‘दिशा’ सारखा कडक कायदा तेथील सरकारने करण्याची गरज आहे.

