महेश लांडगे भाजपत गेल्यानेच राष्ट्रवादीची सत्ता गेली!  

राष्ट्रवादीनेच महेश लांडगे यांना नगरसेवक केले. स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली.
महेश लांडगे भाजपत गेल्यानेच राष्ट्रवादीची सत्ता गेली!  
Mahesh Landage, Raju Misal .jpg

पिंपरी : आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांना २०१४ ला राष्ट्रवादीचे भोसरीचे विधानसभेचे तिकिट दिले असते, तर ते नक्की निवडून आले असते. शहरात पक्षाचा एक आमदार वाढला असता. तसेच त्यानंतर २०१७ ला पक्षाला पालिकेतील १५ वर्षाची सत्ता गमवावी लागली नसती, असा घरचा आहेर पिंपरी-चिंचवड पालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ (Raju Misal) यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा पालिकेत सत्तेत येण्यासाठी राजकारणापलिकडची गेल्या २५ वर्षाची मैत्री असलेल्या महेश लांडगे यांच्या घरवापसीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (NCP lost power after Mahesh Landage joined BJP) 

राष्ट्रवादीनेच महेश लांडगे यांना नगरसेवक केले. स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली. तसेच भाजपमध्ये सध्या त्यांना जाच असल्याने मैत्रीच्या अधिकारातून त्यांनी परत यावे, म्हणून आपण गळ घातली असून हे प्रयत्न शेवटपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मी भाजपमध्ये सुखी समाधानी असल्याने राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे या आवतणावर बोलताना भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लांडगे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. मी भाजपमध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे. त्यानंतर समाजसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अनुभव अतुलनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माझी राजकीय वाटचाल भाजपसोबत कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.

मिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीतील उल्हास शेट्टी, प्रशांत शितोळे आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व आता भाजपमध्ये असलेले आमदार लांडगे, बापू भालेकर आणि राजेश पिल्ले यांची वर्षानूवर्षाची मैत्री आहे. फ्रेंडशिप डे निमित्त ते आवर्जून एका ठरलेल्या ठिकाणी एकाच वेळी एकत्र येत टी पार्टी करतात. यावर्षी योगायोगाने मैत्रीदिनी या सर्वांनी महेशदादांची कन्या साक्षीच्या लग्नानिमित्त केलेल्या डान्सचा दोन महिने जुना व्हिडिओही व्हायरल झाला. त्यामुळे मिसाळ यांना पत्रकारांनी सोमवारी (ता.२ ऑगस्ट ) छेडले असता मैत्रीच्या अधिकारातून आपण महेशदादांना ऑफर दिली असून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी अनौपचारिकरित्या सांगितले. त्यामुळे लगेच तो चर्चेचा विषय झाला. मात्र, लांडगे यांनी त्यावर लगेच पडदाही पाडला.

दरम्यान, २०१४ ला आमदारकीचे तिकिट राष्ट्रवादीने नाकारल्याने लांडगे भोसरीतून अपक्ष लढले आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले. एवढेच नाही, तर त्यांनी २०१७ ला राष्ट्रवादीला खिंडार पाडीत भोसरीतील बहूतांश सर्व नगरसेवकांना भाजपमध्ये आणत पालिकेतही प्रथमच भाजपची सत्ता दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने आणली. आता पुन्हा या दोघांनी साडेसहा महिन्यांनी होऊ घातलेल्या २०२२ च्या पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा कमळ फुलविण्याचा निर्धार केला आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीत या दोघांच्या तोडीचा वा एकहाती सत्ता आणू शकेल, असा एकही नेता नाही. त्यांचे स्थानिक नेते आपापल्या भागापुरते मर्यादित असून त्यांच्यात एकजूट नाही. सगळी मदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. ते आले की तेवढ्यापुरते हे नेते एकत्र येतात व पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा पांगतात. त्यात त्यांचे शहराध्यक्षही आक्रमक नाहीत. त्यांच्या कारकिर्दीतच पालिकेतील सत्ता गेल्याने पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर तरुण, तडफदार अध्यक्ष देण्याची मागणी पक्षाच्या एका गोटातून आता सुरु झालेली आहे. 

राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळात आषाढी वारीतील दिंड्यांना ताडपत्री भेट देण्य़ाच्या २५ लाखाच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचे निमित्त झाले अन त्यांची २०१७ ला सत्ताच गेली. आता, तर पालिकेत भाजपच्या राजवटीत कोट्यवधी रुपयांचे एक नाही, तर अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत. तरीही प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने तेवढ्या आक्रमकतेने त्याविरोधात आवाज उठविलेला नाही. योगेश बहलसारख्या माजी शहराध्यक्ष व अभ्यासू नगरसेवकाने अपवाद म्हणून आपल्या परीने विरोध केल्याचे दिसून आले आहे. शहरात पक्षाचा एक आमदार आहे. मात्र, ते आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. पक्षाच्या कार्यक्रमात वा शहर पातळीवर नेता म्हणूनही ते वावरताना दिसून येत नाहीत. त्यामुळेच महेशदादांसारख्या मोठ्या माशाला गळाला लावण्याचे प्रयत्न मिसाळ यांनी सुरु केले आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये गेल्या पालिका निवडणुकीला गेलेले नगरसेवक पुन्हा परत येऊन पुन्हा आपली सत्ता येईल, असे स्वप्नही शहर राष्ट्रवादी पाहत आहे. 

 Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in