पडळकर, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? - NCP former Pimpri-Chinchwad MLA Vilas Lande criticizes Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकर, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

जेजूरीतील पवारांवरील पडळकरांच्या टीकेने नेमस्त स्वभावाचे लांडे हे पहिल्यांदाच एवढे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. 

पिंपरी : गोपीचंद पडळकर, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अशी विचारणा करीत शरद पवारांवर बोलण्याएवढी तुमची लायकी नाही, असा हल्लाबोल भोसरीचे प्रथम आमदार आणि राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी आज केला. जेजूरीतील पवारांवरील पडळकरांच्या टीकेने नेमस्त स्वभावाचे लांडे हे पहिल्यांदाच एवढे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. 

मागच्या दाराने झालेले आमदार अशी पडळकरांची संभावना लांडेंनी केली. ज्यांना लोकांनी निवडणुकीत नाकारले, ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांनी शरद पवारांवर टीका करताना प्रथम स्वतःची उंची मोजावी, अशी सणसणीत चपराक त्यांनी पडळकरांना लगावली. या टीकेबद्दल पडळकरांनी पवारांची जाहीर माफी मागावी. अन्यथा, तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा लांडे यांनी दिला.

पडळकरांचा बोलवता धनी कोण आहे, कोणाच्या जीवावर ते एवढ्या उड्या मारताहेत, हे सगळ्यांना माहित आहे. ते आमदार आहेत त्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना गुरु मानतात. हे, तरी पडळकरांनी ध्यानात घ्यावे, असा खोचक प्रतिहल्ला लांडेंनी केला. पवारांवर टीका करताना आपली पात्रता काय? हे पडळकरांनी पहायला हवे होते, असा टोला त्यांनी लगावला.

त्या क्लिपमधील आवाज संजय राठोडांचाच : भाजप आमदार येरावरांचा आरोप 

एकही निवडणूक न जिंकलेल्यांनी ती एकही न हरलेल्यांवर अशी टीका करावी, म्हणजे ते सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. त्यामुळे हिंमत असेल तर पडळकरांनी पिंपरी चिंचवड मध्ये पाय ठेऊन दाखवावा. त्यांची पळता भुई थोडी करू, असे लांडे म्हणाले.

धनंजय आणि पंकजा मुंडे बीड लिल्हा बॅंकेसाठी दोन हात करणार की बिनविरोधसाठी हात मिळविणार? 
 

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही पडळकरांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनीही शहरात पडळकरांना पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. पक्षाच्या पदवीधर संघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पडळकर हे निव्वळ अशा बेअक्कल आणि पोरखेळ गोष्टी फक्त प्रसिद्धीसाठी करत आहेत. त्यांच्या पक्षानेही त्याला दुजोरा दिला आहे. त्यांच्यासारखे लोक भाजपने पक्षात ठेवलेत यावरूनच त्यांची संस्कृती दिसून येते.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख