पिंपरी-चिंचवडच्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील गप्प का? 

भाजपच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा स्थायी समितीवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर फाटला गेला.
 Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Sanjog Waghere .jpg
Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Sanjog Waghere .jpg

पिंपरी : गल्ली ते दिल्ली इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या राजकीय पोळ्या भाजणारा भाजप व त्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या भ्रष्टाचारावर गप्प का, असा सवाल राष्ट्रवादीने सोमवारी (ता.१३) विचारला. आपल्या सत्ताधारी पालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेताना पकडला गेल्यानंतर त्यांना आपली नैतिकता आठवली नाही का, अशी विचारणाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. (NCP city president criticizes BJP) 

भाजपच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा स्थायी समितीवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर फाटला गेला. त्यात स्थायी समितीच्या अध्यक्षांना अटक झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतू नैतिकतेचा विसर पडलेल्या भाजपने त्यांचा राजीनामा घेतला नाही. उलट जामिनावर सुटलेल्या स्थायी अध्यक्षांकडूनच त्यांनी कारभार सुरू ठेवला आहे. त्यातून भाजपचे भ्रष्टाचाराला असलेले समर्थन उघडपणे स्पष्ट होते आहे. तरीही त्यावर त्यांचे राज्यातील नेते  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील गप्प आहेत. 

त्यांनी पिंपरी चिंचवडकरांना या लाच प्रकरणावरून उत्तर देणे गरजेचे आहे. त्यातील स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा कधी घेणार, हे ही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा पिंपरी चिंचवड पालिकेत त्यांच्या राजवटीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभार बघता भाजपच्या नेत्यांना पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. असेच समजावे लागेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. 

त्यात ते म्हणतात, पालिकेच्या अनेक कामात रिंग, भ्रष्टाचार चालला आहे. शहराच्या नागरिकांचा हिताचा विचार कुठेही दिसत नाही. मागील साडेचार वर्षात भाजपने पिंपरी महापालिकेत कारभार करताना शहराची दुर्दशा केली आहे. नागरिकांच्या हिताचा विचार कुठेही दिसत नाही. याउलट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडचा कायापालट केला. बेस्ट सिटीचा बहुमान या शहराला मिळवून दिला. आमच्या पंधरा वर्षाच्या कारकीर्दीतील विकासकामांना तोड नव्हती. 

विकासकामांवरून राष्ट्रवादीशी दोन हात करणे अशक्य होते. त्यामुळे भाजपने २०१७ ला निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील आमच्या कारभारावर बेछूट आरोप केले. त्यांच्या खोट्या आरोपांना भाजपच्या राज्यातील नेत्यांनी बळ दिले. चौकशा करण्याच्या वल्गना केल्या. प्रत्यक्षात त्यावेळी भाजपने आरोप केलेल्या आणि त्यांच्याच सत्ताकाळात चौकशी झालेल्या विठ्ठलमूर्ती, शवदाहिनीसारख्या एकाही प्रकल्पात काहीही समोर आले नाही. राष्ट्रवादी विकासाचा अजेंडा राबवत असताना जनतेच्या तिजोरीवर कोणी डल्ला मारणार नाही, याची खबरदारी घेत होते, असा टोलाही वाघेरेंनी लगावला.  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com