राष्ट्रवादी विरोधक म्हणून फेल : कॉंग्रेसचा हल्लाबोल 

पालिका निवडणुकीत आघाडी होईल की नाही, अशी चर्चा यामुळे शहरात सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी विरोधक म्हणून फेल : कॉंग्रेसचा हल्लाबोल 
Nationalist Congress Failed as a Opposition in Pimpri : Congress Attack

पिंपरी : मागील साडेचार वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष सक्षमपणे भूमिका निभावत नाही. त्यामुळे सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर कॉंग्रेसला वेळोवेळी रस्त्यावर उतरावे लागले. पालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तीव्र आंदोलने पक्षाने केली, असा घरचा आहेर महाविकास आघाडीतील कॉंग्रेसने रविवारी (ता. ५) राष्ट्रवादीला दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यानंतर पिंपरीतही आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत ही धूसपूस सुरु झाल्याने पालिका निवडणुकीत आघाडी होईल की नाही, अशी चर्चा यामुळे शहरात सुरु झाली आहे. (Nationalist Congress Failed as a Opposition in Pimpri : Congress Attack)

नुकत्याच जाहीर झालेल्या कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत चिटणीस म्हणून नियुक्ती झालेले पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी हा घरचा आहेर दिला आहे. शहरातील गौतम आरकडे यांचीही या नव्या कार्यकारिणीत चिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. या दोघांचाही सत्कार आज पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी साठे यांनी हा हल्लाबोल केला. 

माजी महापौर कविचंद भाट अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, राजेंद्रसिंह वालिया, शहाबुद्दीन शेख, मयूर जयस्वाल, विशाल कसबे, भाऊसाहेब मुकूटमल आदी या वेळी उपस्थित होते.

शहरातील पक्षाचे कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असून त्यांच्या आत्मसन्मानासाठी माझा लढा राहणार असल्याचे साठे यांनी सांगितले. शहरात सध्या पक्षाचा एकही नगरसेवक तसेच आमदारही नाही. त्याकडे बहुधा त्यांचा हा रोख होता. प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम आता मी आणि आरकडे प्रदेश कॉंग्रेसकडे करणार आहे,असे साठे म्हणाले.तर,सध्या शहरात कॉंग्रेसची बिकट अवस्था आहे,अशी खंत भाट यांनी व्यक्त केली. मागील काही वर्षांपासून पक्ष कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहे, असे आरकडे म्हणाले. पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आता सर्वांनी मरगळ झटकून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in