आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार.. नाना पटोलेंचे संकेत

महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत.
आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार.. नाना पटोलेंचे संकेत
nana17.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असून तयारीला लागा, असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत दिले आहेत. पिंपरी चिंचवडला लवकरच नवा अध्यक्ष देऊ, असेही ते यावेळी म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष झाल्यावर प्रथमच त्यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात घेतली. सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ अशी अडीच तास ही बैठक चालली. 

यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे आणि सर्व सेल अध्यक्ष उपस्थित होते. सर्वांचे म्हणणे यावेळी पटोले यांनी ऐकून घेतले. त्या सर्वांनी शहर काँग्रेसला ताकद देण्याची मागणी केली. शहरात एकही पक्षाचा नगरसेवक नसला, तरी पक्षाची ताकद आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला आहे. फक्त शहरातील पक्ष कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे, असे साठे म्हणाले. 

शहरात पक्षाचा एकही आमदार नसल्याने शहराचे प्रश्न विधीमंडळात मांडले जात नाहीत, याकडे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल यांनी प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. तर, चार महिन्यापूर्वी साठे यांनी दिलेला पदाचा राजीनामा निवडणुकीच्या तोंडावर  मंजूर न करता त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली, तर चांगले यश मिळेल, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी सचिव श्यामला सोनवणे म्हणाल्या. 

सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांना चार्ज करणारे भाषण पटोलेंनी केले. २०२४ ला काँग्रेसला राज्यात सत्तेत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. मी स्वतः शहराच्या पक्ष संघटनेत लक्ष घालणार असून पक्षाच्या मंत्र्यांचे शहरात जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in