पालिका पोटनिवडणूक एप्रिलला, बिनविरोध होण्याची दाट शक्यता  - Municipal by-elections in April, likely to be uncontested | Politics Marathi News - Sarkarnama

पालिका पोटनिवडणूक एप्रिलला, बिनविरोध होण्याची दाट शक्यता 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कोरोनाने लांबलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रभागातील पोटनिवडणुकीचे पडघम मिशन बिगीनअंतर्गत आता वाजले असून येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती होण्याची शक्यता आहे

पिंपरी : कोरोनाने लांबलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रभागातील पोटनिवडणुकीचे पडघम मिशन बिगीनअंतर्गत आता वाजले असून येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी मतदारयादी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

कोरोनाने राष्ट्रवादीचे दोन, तर सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा बळी घेतला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ  नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांचे गेल्यावर्षी १२ मार्च, तर दुसरे नगरसेवक जावेदभाई शेख यांचे ३१ जुलैला कोरोनाने निधन झाले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचा याच आजाराने २६ सप्टेंबरला बळी घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर ही पोटनिवडणूक राज्यातील काही महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबर घेण्याचे आयोगाने ठरवले आहे. 

त्यासाठी तेथील मतदारयाद्या तयार करण्यास त्यांनी सांगितले आहे. या तिन्ही ठिकाणी मृत नगरसेवकाच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न लगेच सुरु झाले आहे.

१२ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणारआहे. त्यानंतर निवडणुकीचा अवधी विचारात घेतला, तर ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वाटते. तसे झाले, तर विजयी होणाऱ्याला अवघा दहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. कारण पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यातूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही चालले आहे. पालिकेत स्पष्ट बहूमत असल्याने निवडणूकीच्या फंदात भाजप पडणार नाही, असे त्यांच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले. 

हे हि वाचा...

अभाविपचे प्रदेश अधिवेशन प्रथमच उद्योगनगरीत होणार
 
पिंपरी : जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असा दावा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) प्रदेश अधिवेशन प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या रविवारी (ता.७) होणार आहे. आत्मनिर्भर भारत’ आणि ‛राष्ट्रीय शिक्षा नीती’ हा या अधिवेशनाचा प्रमुख विषय आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या या ५५ व्या प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन  केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर याच्या हस्ते होणार आहे. स्वागत समिती अध्यक्ष म्हणून मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहेता, बालाजी शैक्षणिक संस्थेचे संचालक परम बालसुब्रमन्यम् हे उपाध्यक्ष, तर अभाविपचे पूर्व कार्यकर्ते अॅड. मोरेश्वर शेडगे हे सचिव असतील. नुकताच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभाविप चे पूर्व कार्यकर्ते गिरीश प्रभूणे हे स्वागत समिती संरक्षक असणार आहेत.

उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची शैक्षणिकनगरी म्हणून नविन ओळख होऊ पहात आहे, त्यामुळे अभाविपचे प्रदेश अधिवेशन विद्यार्थी जडणघडणीत मोलाचे ठरेल. असे शेडगे म्हणाले..

अभाविप ही गेली ७२ वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेली विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थी हा उद्याचा नाही आजचा नागरिक असून संघटन बंधनातून राष्ट्रहितासाठी झटणारे विद्यार्थी घडवणे हे ध्येय ठेवून ती कार्यरत असल्याचे शेडगे यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख