कोट्यवधीचे 'मलईदार' प्रस्ताव अखेर महानगरपालिकेने गुंडाळले

यामुळे हे ठराव अगोदर पास केलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.
कोट्यवधीचे 'मलईदार' प्रस्ताव अखेर महानगरपालिकेने गुंडाळले
pcmc.jpg

पिंपरी : सध्या कोरोनामुळे बंद असलेल्या बालवाड्या व शाळांत अडीच कोटी रुपये खर्चून वॉटर फिल्टर व कूलर बसविणे आणि बालवाडीतील मुलांना स्वच्छता किट देणे असे मलईदार विषय पिंपरी-चिंचवड (PCMC) पालिकेच्या बैठकीत बुधवारी (ता.१६ जून) तहकूब करण्यात आले. ''बंद बालवाड्या, शाळांमध्ये कूलर बसविण्याचा पालिकेचा पुन्हा घाट'' या हेडिंगखाली 'सरकारनामा'ने मंगळवारी (ता.१५) बातमी व्हायरल केली होती, तिचा परिणाम झाला. (Municipal Corporation rejected the proposal to install water filter in the school)

दरम्यान, यामुळे हे ठराव अगोदर पास केलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. कोरोनामुळे सध्या बालवाड्यांसह शाळा गेले वर्षभर बंद आहेत. तरीही तेथे वॉटर फिल्टर व कूलर बसविण्याचा घाट पालिकेतील सत्ताधारी भाजपने एप्रिलमध्येच घातला होता. त्याबाबत कोरोना महामारीत तातडीने आवश्यक नसल्याची बातमी 'सरकारनामा'ने दिल्यानंतर २८ एप्रिलला स्थायी समितीने तो दफ्तरी दाखल केला होता. 

त्यानंतर जाग आलेल्या विरोधी पक्ष राष्ट्रवादीने (NCP) हा पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार फक्त टक्केवारी आणि ठेकेदार पोसण्यासाठी असल्याचा हल्लाबोल सत्ताधारी भाजपवर (BJP) केला होता. त्यानंतरही दफ्तरी दाखल केलेला हा प्रस्ताव पुन्हा स्थायीसमोर मंजुरीसाठी बुधवारी ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे तो मंजूर केला जातो की काय याकडे लक्ष लागले होते. मात्र, सध्या शाळा उघडण्याची शक्यता नाही. काही माध्यमिक शाळा, मात्र बुधवारपासून फक्त ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. परिणामी हा विषय स्थगित ठेवण्यात आला. तर, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके लक्ष्य होणार असल्याने बालवाड्या बंदच राहणार आहेत. 

त्यामुळे बालवाड्यांतील बालकांना स्वच्छता किट देण्याचा वॉटर फिल्टरसारखा दुसरा मलईदार विषयही तहकूब ठेवण्यात आला. त्यामुळे तूर्तास काही कोटी रुपयांच्या करदात्यांच्या पैशांची बचत झाली आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या ७१ कोटी ६५ लाख रुपये खर्चास स्थायीने बुधवारी मान्यता दिली. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अँड नितीन लांडगे होते.  
Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in