बनावटगिरी करुन पदोन्नती मिळवणाऱ्यांची आधी पदावनती अन् आता कारवाईची तंबी - Municipal Corporation issues stern warning to employees who submit fake certificates for promotion | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बनावटगिरी करुन पदोन्नती मिळवणाऱ्यांची आधी पदावनती अन् आता कारवाईची तंबी

उत्तम कुटे  
मंगळवार, 20 जुलै 2021

प्रशासनाने पालिकेची दिशाभूल केल्याचे गोंडस नाव देऊन या कर्मचाऱ्यांविरुद्ध होणारी फौजदारी कारवाई टाळली आहे.

पिंपरी : बनावट टंकलेखन (टायपिंग) प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेतलेल्या २५ जणांना पिंपरी-चिंचवड  (Pimpri-Chinchwad) महापालिकेने सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान, या २५ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ही बनावटगिरी शाबीत होताच पुन्हा त्यांना तृतीयश्रेणीतून (लिपीक तथा क्लार्क पदाहून) पुन्हा चतुर्थश्रेणीत पदावनत करण्यात आले होते. त्यामुळे खातेनिहाय चौकशीत त्यांना फक्त सक्त ताकीद देण्यात आली. तसेच पुन्हा असे अवैध प्रमाणपत्र सादर केले, तर मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ सेवा समाप्त केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांना देण्यात आला आहे. (Municipal Corporation issues stern warning to employees who submit fake certificates for promotion) 

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

दरम्यान, बनावट दस्ताऐवजाव्दारे पालिकेची फसवणूक करण्याचाच हा प्रकार आहे. मात्र, त्याला प्रशासनाने पालिकेची दिशाभूल केल्याचे गोंडस नाव देऊन या कर्मचाऱ्यांविरुद्ध होणारी फौजदारी कारवाई टाळली आहे. तसेच दरम्यानच्या काळात १७ महिने या क्लास फोर कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीवरील क्लास थ्रीचा पगारही घेतलेला आहे. एकूणच हे औटघटकेचे  प्रमोशन पालिका वर्तुळात मोठा चर्चेचा विषय झाले आहे. ते घेतलेल्यांत पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासह, आरोग्य विभाग, अग्निशमन, करसंकलन, उद्यान, सुरक्षा, वैद्यकीय आदी विभागातील कर्मचारी आहेत.

ड श्रेणीतील (क्लास फोर) या २५ कर्मचाऱ्यांनी लिपीक पदाच्या (क्लास थ्री) पदोन्नतीसाठी आवश्यक मराठी व इंग्रजी टंकलेखनाची (इंग्रजीसाठी तीस शब्द प्रति मिनिट, तर मराठीकरिता चाळीस शब्द प्रति मिनिट वेग) अवैध प्रमाणपत्रे सादर करून ही पदोन्नती घेतली होती. एवढेच नाही, तर १७ महिने या पदाचा पगारही घेतला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी दिलेलीही टंकलेखनाची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे राज्य परिक्षा परिषदेच्या पडताळणीत आढळले. 

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

त्यामुळे ताबडतोब ही पदोन्नती घेतलेल्यांना पदावनत (क्लास थ्री) करण्यात आले. नंतर, त्याची खातेनिहाय चौकशी (डीई) सुरु करण्यात आली होती. त्यात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. मात्र, अगोदरच त्यांना पदावनतीची जबर शिक्षा देण्यात आल्याने पुन्हा ती करणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नसल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी त्यांना फक्त सक्त ताकीद दिली. मात्र, पुन्हा असा प्रयत्न केल्यास कुठलाही पूर्वसूचना न देता तात्काळ सेवा समाप्त करण्याचा सज्जड दम त्यांना देण्यात आला आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख