खासदार बारणेंनीही सुरू केले कोविड सेंटर; नगरसेवक वाघेरेंनी दिले ३० लाखांचे साहित्य

वाघेरे यांच्या कोरोना सामग्रीच्या लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.
MP Shrirang Barne started Kovid Center in Pimpri Chinchwad
MP Shrirang Barne started Kovid Center in Pimpri Chinchwad

पिंपरी  ः नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील मंगल कार्यालयात भव्य असे कोविड सेंटर उभारल्यानंतर त्यांचा कित्ता पिंपरी-चिंचवडमध्ये गिरवण्यास सुरवात झाली आहे. शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका खासगी रुग्णालयातच नुकतेच (ता. २२ एप्रिल) कोविड सेंटर सुरु केले. त्यानंतर आता भाजपचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वखर्चाने तीस लाख रुपयांचे चार व्हेंटीलेटर, पन्नास फाऊलर बेड आणि दोन हाय फ्लो पालिका रुग्णालयाला आज (ता. २६ एप्रिल) दिले. एवढी मोठी कोरोना मदत करणारे वाघेरे हे शहरातील पहिलेच नगरसेवक आहेत.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपल्या सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आजपासून लोकमान्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले.

शहरात वाघेरेंसारखे अनेक मातब्बर नगरसेवक सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहेत. त्यांनी काहीअंशी वाघेरे, आमदार जगताप व खासदार बारणे यांचे अनुकरण केले, तर कोरोनाविरुद्धच्या प्रशासनाच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. शिवाय कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फरफट व धावपळ काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

वाघेरे यांच्या कोरोना सामग्रीच्या लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली, हे विशेष. त्यात खासदार बारणे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे माजी गौतम चाबुकस्वार, शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, प्रभाग सदस्य कुणाल लांडगे यांच्यासह पालिका आयुक्त राजेश पाटील या वेळी उपस्थित होते. 

या मदतीमागील भूमिका स्पष्ट करताना वाघेरे म्हणाले, कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती हाताळताना प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. म्हणून तिला छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न म्हणून मी खारीचा वाटा उचलला आहे. सत्ता आणि खुर्ची ही राबवायची असते, उबवायची नसते, हे ब्रीद घेऊन मी काम करीत आहे. तसेच, ज्या समाजाने मला नेतृत्वाची संधी दिली, त्यांच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. यातून काही रुग्णांना दिलासा मिळाला, तरी माझे हे प्रयत्न सत्कारणी लागेल, असे मी समजतो. आयुक्तांनीही वाघेरे यांचे कौतुक केले. खासदार बारणे व लांडे यांनी इतर लोकप्रतिनिधींना या उपक्रमातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने शहरातील निगडी प्राधिकरणामधील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये  ६७ बेडचे कोविड केअर सेंटर आज (ता. २६ एप्रिल) सुरु करण्यात आले. ते सुरू करण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. श्रीकृष्ण जोशी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, सचिव रवी नामदे यांनी पुढाकार घेतला. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर ५७  ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटरच्या बेड असलेले हे सेंटर सुरु करण्यात आले आहे, असे बारणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com