बोपखेल पूलाच्या श्रेयवादात राष्ट्रवादी, भाजपनंतर आता शिवसेनेचीही उडी

महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने शहरातील प्रमुख राजकीय पक्षांत आतापासूनच श्रेयाची लढाई सुरु झाली आहे.
बोपखेल पूलाच्या श्रेयवादात राष्ट्रवादी, भाजपनंतर आता शिवसेनेचीही उडी
Shrirang Barne .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील उड्डाणपुलाचे संरक्षण विभागाच्या हद्दीतील काम लष्कराच्या परवानगीअभावी रखडले होते. ती नुकतीच (ता.९) मिळाली. ती आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा लगेचच (ता.१०) राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि भाजपने केला होता. त्यानंतर सोमवारी (ता.१३) आपल्या पाठपुराव्यामुळे ती मिळाल्याचा दावा आता शिवसेनेनेही ठोकला. महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने शहरातील प्रमुख राजकीय पक्षांत आतापासूनच श्रेयाची लढाई सुरु झाल्याचे यातून पहावयास मिळत आहे. (MP Barne said the Bopkhel bridge was allowed because of me)

माजी संरक्षणमंत्री शरद पवारांच्या माध्यमातून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे संरक्षण विभागाची ही परवानगी मिळाली असे शहरातील राष्ट्रवादीचे आमदार (पिंपरी) अण्णा बनसोडे व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गेल्या शुक्रवारी (ता.१०) सांगितले होते. तर, शहरातील भाजप आमदार (चिंचवड) लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा प्रतिदावा बोपखेलकर असलेल्या शहराच्या उपमहापौर हिराबाई घुले यांनी त्यावर लगेचच केला होता. त्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या पाठपुराव्याला यश येऊन ही अंतिम परवानगी मिळाल्याचे आता सांगितले आहे. तसेच आता महापालिकेने वेळ न घालविता पुलाचे काम तत्काळ हाती घ्यावे, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

त्यात ते म्हणतात, महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासीयांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे ४ जानेवारी २०१९ मध्ये काम सुरू झाले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. ती न मिळाल्याने हे काम थांबले होते. कामाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले. वर्किंग परवानगी मिळावी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. २४ सप्टेंबर २०२० रोजी संरक्षण विभागाच्या अधिका-यांशी पत्रव्यहार केला. सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला. बोपखेल या ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणासाठी हा पुल एकमेव मार्ग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठीही याच पुलाचा वापर करावा लागणार असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतील कामाला तत्काळ परवानगी देण्याची विनंती केली. अखेर त्याला यश आले, असे बारणे यांनी म्हटले आहे.

याबाबत बारणे म्हणाले, बोपखेल पुलासाठी २०१६ पासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, निर्मला सीतारामण आणि विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. बोपखेल पुलाचे, खडकीला जोडणा-या संरक्षण हद्दीतील रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी ‘वर्किंग’ परवानगी बाकी होती. पुलाला विलंब होत असल्याने स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न करुन पुलाच्या कामाला गती दिली. वर्किंग परवागी मिळण्यासाठी संरक्षण विभागाच्या दक्षिण कमांडचे महानिर्देशक अमोल जगताप, पुणे मंडलाच्या रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांना २४सप्टेंबर २०२०रोजी मी पत्र पाठविले होते. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर वर्किंग परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in