आगे आगे देखिए.. होता है क्या! : राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हेंचे सूचक वक्तव्य

अमोल कोल्हे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत सक्रिय होणार...
आगे आगे देखिए.. होता है क्या! : राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हेंचे सूचक वक्तव्य
amol-kolhe-ff.jpg

पिंपरी : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काळभोरनगरमध्ये घेतली. गेल्या साडेतीन वर्षात व कोरोना काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेली खरेदी, घेतलेले निर्णय व पुढील काळात आपली भूमिका काय असेल, याचा आढावा त्यांनी घेतला.

लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हे यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पहिल्यांदाच घेतली. यापूर्वी त्यांनी निगडीत घेतलेली बैठक मोजक्‍याच पदाधिकाऱ्यांसमवेत होती. त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व पात्र झाले.

कोरोनाकाळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पक्षाचे कार्यकर्ते रसूल सय्यद व युनूस पठाण यांचा सन्मान केला.
पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, ""रॅपिड टेस्टचा रिपोर्ट उशिरा येणे अक्षम्य बाब आहे. असा प्रकार कोरोनावाढीसाठी पोषक ठरक शकतो. यात महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. कोरोनावरील औषधांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे आली आहेत. त्यांचे पालन करावे लागणार आहे.''

स्मार्ट सिटीच्या कामांचा कोरोना काळात किती उपयोग झाला. या काळात झालेली खरेदी, त्यावर घेतलेले आक्षेप तपासायला हवेत. मयताच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे करणाऱ्या माफ केले जाणार नाही. कोरोना काळात लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, रात्री-अपरात्री काढलेल्या निविदा, केलेली विकास कामे, या सगळ्यांची उत्तरे सत्ताधारी भाजपला द्यावे लागतील, असा दमही त्यांनी दिला.

कोल्हे म्हणाले, ""या पुढील काळात होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभांच्या दिवशी महापालिका आवारात किंवा विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात मी सातत्याने दिसेल. सभागृहामध्ये गैरव्यवहारांविरुद्ध आवाज उठविण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केले आहे. या विरोधाला आणखी धार चढविण्याचे काम करणार आहे. आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा आम्ही मांडणार आहोत. लोकहितांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावरसुद्धा येण्याची आमची तयारी आहे.''

यह सिर्फ ट्रेलर है...
मला कोणी नेता म्हणते, कोणी अभिनेता म्हणतो. अभिनेता संपूर्ण चित्रपट सुरवातीला दाखवत नाही. आधी ट्रेलर दाखवतो. तसे आजची बैठक ही ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता हैं क्‍या!, हे डॉ. अमोल कोल्हे यांचे वाक्‍य, त्यांनी शहर राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेतल्याची द्योतक ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in