अमोल कोल्हे यांनी सांगितले रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याचे कारण

पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुण्यासह राज्यभर कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
अमोल कोल्हे यांनी सांगितले रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याचे कारण
Amol Kolhe .jpg

पिंपरी : रेमडेसिव्हिरचा अतरिक्त तथा अनावश्यक वापर होत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. कुठल्या रुग्णाला त्याची गरज आहे व कोणाला नाही, हे ही त्यांनी डॉक्टरी भाषेत समजावून सांगितले.  

खासदार श्रीरंग बारणे यांनीही दोनच दिवसांपूर्वी गरज नसताना रेमडेसिव्हिर दिले जात असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले होते. पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या दोन विभिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या (राष्ट्रवादी आणि शिवसेना) खासदारांत रेमडेसिव्हिर वापराबाबत, मात्र एकमत दिसून आले आहे.

सध्या पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुण्यासह राज्यभर कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार सुरु झाला असून मूळ किमतीच्या वीसपट दराने त्याची बेकायदेशीर विक्री होत आहे. तशा टोळ्यांना पोलिसांनी पकडलेही आहे. गरजू रुग्णांना ते वेळेत न मिळाल्याने त्यांचा जीव गेल्याच्याही घटना घडल्याने राज्यभर हा विषय मोठा गंभीर झाला आहे. त्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने आता त्याच्या निर्यातीवर नुकतीच बंदी आणली आहे.

या औषधाच्या टंचाईमागील कारणमिमांसा करताना कोरोना रुग्णसंख्येत झालेली प्रचंड वाढ, त्यातुलनेत होत नसलेले या औषधाचे उत्पादन म्हणजेच मागणीच्या तुलनेत कमी असलेला पुरवठा आणि त्याचा अतिरिक्त तथा अनावश्यक वापर यामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवतो आहे, असे कोल्हे म्हणाले. अनावश्यक वापर रोखणे आपल्या हातात असून ता केला गेला, तर काही अंशी तुटवडा कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना या औषधाची गरज नसून ९२ च्या आत ऑक्सिजनची पातळी आणि सतत तीन दिवस शंभरावर ताप असलेल्यांनाच ते आवश्यक आहे. तसेच मधूमेह, कर्करोग, अॅनिमियाग्रस्तांना ते गरजेचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रेमडेसिव्हिर हे अमृत असल्याची भावना दूर होण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in