विकास निधीतून 25 लाखांची रेमडेसिव्हिर देण्याच्या भाजप आमदाराच्या प्रस्तावाला केराची टोपली

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने व त्यातून या आजारावरील रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवू लागल्याने जगताप यांनी परवा (ता.१४) ही मागणी केली होती.
विकास निधीतून 25 लाखांची रेमडेसिव्हिर देण्याच्या भाजप आमदाराच्या प्रस्तावाला केराची टोपली
Laxman Jagtap .jpg

पिंपरी : चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या २०२१-२२ या वर्षाच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची  रेमडेसिव्हिर इंजेक्शन पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्याचा पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेला प्रस्ताव काल (ता. १५) नाकारण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने व त्यातून या आजारावरील  रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवू लागल्याने जगताप यांनी परवा (ता.१४) ही मागणी केली होती.

परंतू,आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात रेमडेसिव्हिरचा समावेश नसल्याने हा प्रस्ताव नाकारल्याचे काल (ता.१५) जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांनी जगताप यांना कळवले. त्यावर खास बाब म्हणून या कामाला निधी देण्यासाठी राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवावा, असे दुसरे पत्र जगताप यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्य सरकार ते मान्य करते का याकडे आता लक्ष लागले आहे. तसे झाले, तर राज्यातील इतर आमदारांनाही आपला निधी रेमडेसिव्हिर साठी देता येणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना आल्यानंतर २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाच्या आमदार निधीतून विशेष बाब म्हणून पन्नास लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली. खास बाब म्हणून फक्त एकदाच हा निधी आमदारांना देण्याची अट त्यात टाकण्यात आली. तसेच तो फक्त पीपीई कीट, व्हेंटीलेटर, आयसीयू बेड, कोरोना टेस्टींग किट, थर्मामीटर, फेसमास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज आणि आरोग्य व वैद्यकीय विभागाने सुचविलेले कोरोनाचे तत्सम साहित्य यासाठीच वापरला जाणार आहे. 

यामध्ये रेमडेसिव्हिरसाठी तो उपयोगात आणण्याची तरतूद नसल्याने जगताप यांचा त्यासंदर्भातील प्रस्ताव अनुज्ञेय असल्याचे सांगून नाकारण्यात आला. मात्र, नवीन वर्षासाठी सरकार आपल्या आदेशात रेमडेसिव्हिरचा समावेश करील, अशी आशा जगताप यांना वाटते आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in