पंतप्रधान, मुख्यमंत्री भेटीतून हाती काहीच नाही! 

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळाले नाही
पंतप्रधान, मुख्यमंत्री भेटीतून हाती काहीच नाही! 
Chief Minister Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi .jpg

पिंपरी : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळाले नाही, अशी खंत मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणारे व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले विनोद पाटील यांनी व्यक्त केली. या भेटीतून साधे आश्वासन सुद्धा मिळाले नाही, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. (The Maratha community did not get anything from the visit of the Prime Minister and the Chief Minister)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणासह बारा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. मी व माझे सहकारी समाधानी असल्याचे ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितले. मात्र, विनोद पाटील यांनी या भेटीतून समाजाला काहीही मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना पाटील म्हणाले, कालपासून राज्यात चित्र रंगवले गेले होते, की ही भेट फक्त मराठा आरक्षणासाठी आहे. प्रत्यक्षात, मात्र तसे काहीच घडले नाही आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. वाटले होते, आज जबाबदारी निश्चित होईल. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारबाबत असे काहीच झाले नाही. साधे आश्वासन सुद्धा मिळाले नाही, हे दूर्दैवी आहे, आरक्षण मुद्दा अनेक मुद्द्यांपैकी एक होता. 

दरम्यान, मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये हे आम्ही स्पष्ट सांगतोय. आम्ही उद्विग्न झालो आहे. समाज रस्त्यावर आला की काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते, आजचा प्रकार ही तसलाच आहे. बैठक संपेपर्यंत भाबडी आशा होती. वाटत होते काहीतरी होईल. मात्र, सरकारने काहीही सांगितले नाही वा स्पष्ट केले नाही त्यामुळे पुन्हा शून्य अशी अवस्था झालीये. सरकारने आता त्यांच्या हातात जे आहे ते समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in