भोसरीच्या विकासकामांना मंजूरीचा सपाटा; चिंचवड व पिंपरीचा मात्र राहतोय बँकलॉग

या महिनाअखेर मुदत संपत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समिती सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे भरू लागली आहेत.बुधवारच्या (ता.१०) सभेत १७८ कोटी रुपयांचे विषय मंजूर करण्यात आले.त्यातील ८१ कोटी रुपयांहून अधिक निधीची विकासकामे ही शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांच्या मतदारसंघातील आहेत.
भोसरीच्या विकासकामांना मंजूरीचा सपाटा; चिंचवड व पिंपरीचा मात्र राहतोय बँकलॉग
pcmc

पिंपरी : या महिनाअखेर मुदत संपत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समिती सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे भरू लागली आहेत.बुधवारच्या (ता.१०) सभेत १७८ कोटी रुपयांचे विषय मंजूर करण्यात आले.त्यातील ८१ कोटी रुपयांहून अधिक निधीची विकासकामे ही शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांच्या मतदारसंघातील आहेत. 

विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष संतोषअण्णा लोंढे हे भोसरीतील असून ते महेशदादांचे समर्थक असल्याने भोसरीतील विकासकामांना शहरातील चिंचवड आणि पिंपरी या इतर दोन विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत झुकते माप मिळत आहे.चिंचवड हा शहराचे दुसरे कारभारी व भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा, तर पिंपरी हा  राष्ट्रवादीचे  अण्णा बनसोडेंचा मतदारसंघ आहे. 

स्थायी अध्यक्षांसह निम्या म्हणजे आठ सदस्यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे.त्यामुळे सध्या ती कोटीच्या कोटी उड्डाण भरून कोरोना काळातील बॅकलॉग भरून काढते आहे. पुढील अध्यक्ष भाऊ समर्थक झाला, तर आपले विषय मंजूर न होण्याच्या शक्यतेतून भोसरीतील विकासकामे मंजूरीचा धडाका सध्या सुरु आहे.परवाच्या सभेत मान्यता दिलेल्या १७८ कोटी रुपयांच्या विषयांत   मोशी कचरा डेपोतील बायो मायनिंगसाठी ४३ कोटी, चिखलीच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पाकरिता (एसटीपी) ११ कोटी, धावडे वस्तीतील आरक्षण विकसनासाठी १२ कोटी, आळंदी-पुणे पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्याकरिता ११ कोटी,  डांबरीकरणाला दीड कोटी असे ८१ कोटींहून अधिक रकमेची विकासकामे भोसरी विधानसभा मतदारसंघातीलचआहेत. यापूर्वी स्थायीच्या बैठकांतही भोसरीतीलच कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प मंजूर केले गेले आहेत.त्याची जाहिरातबाजीव्दारे श्रेयही घेण्यात आले आहे.
 
भाऊंच्या मतदारसंघातील विकासकामांना स्थायीत सध्या तुलनेने कमी संख्येने मान्यता दिली जात आहे. त्यावरून स्थायीतील  भाऊ समर्थका सदस्यांनी आपली कामे होत नसल्याबद्दल बैठकीत अनेकदा गोंधळ केलेला आहे. या दोन गटातील हा वाद माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी  मध्यस्थी करीत मिटवण्याचा प्रयत्न मुंबईत केला आहे. भाऊ समर्थक स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात चिंचवडला झुकते माप  होते. मात्र, या दोघांच्या ओढाओढीत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी मतदारसंघातील विकासकामे तुलनेने कमी मंजूर होत आहेत. तरीही त्याबाबत स्थायीतील राष्ट्रवादीच्या सदस्यांचे मौन आहे. त्यामुळे त्याची मोठी चर्चा आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in