पहिलवान आमदार महेश लांडगेही शेतकरी आंदोलनाच्या आखाड्यात   - Mahesh Landage Criticism of international celebrities who tweeted against the Farmers movement | Politics Marathi News - Sarkarnama

पहिलवान आमदार महेश लांडगेही शेतकरी आंदोलनाच्या आखाड्यात  

उत्तम कुटे 
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या आखाड्यात आता भोसरीचे पहिलवान आमदार महेश लांडगे उतरले आहेत.

पिंपरी : आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या आखाड्यात आता भोसरीचे पहिलवान आमदार महेश लांडगे उतरले आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरलेल्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना आम्हा भारतीयांना आमचा देश उत्तम समजतो असे त्यांनी सचिन तेंडूलकरच्याच भाषेत आज फटकारले. तसेच सोशल मिडियातील आंदोलक समर्थकाच्या #IndiaTogether व #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग मोहिमेला त्यांनी आपल्या फेसबुक पेजव्दारे पाठिंबा दिला.

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण अभ्यासिका ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे ट्विट करताच मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, कंगना राणावत यांच्यापासून गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापर्यंतच्या भारतीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा प्रतिवाद केला. 

भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होणार नाही. बाह्यशक्तीने फक्त प्रेक्षक बनावे. यातील भागीदार बनू नये. भारतीयांना भारत माहिती आहे आणि ते भारताबाबतचा निर्णय घेऊ शकतात, असे आंतराष्ट्रीय सेलिब्रिटींना सुनावत एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे आवाहन करणारे ट्विट सचिनने इंग्रजीत केले होते. 

त्यानंतर महेश लांडगेही फेसबुकवर व्यक्त झाले. सचिनच्या ट्विटसारखीच पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. प्रेक्षक भुमिकेतून प्रत्यक्ष खेळात सहभागी होण्याचा प्रयत्न करू नये. आम्हा भारतीयांना आमचा देश उत्तम समजतो व त्याबाबत निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत लांडगे यांनीही चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या असे आवाहन आपल्या पोस्टमधून केले आहे.

केंद्र सरकारला समर्थन करणाऱ्या #IndiaAgainstPropaganda आणि #IndiaTogether हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्यात महेश लांडगेही सहभागी झाले आहेत.  #IndiaTogether #IndiaAgainst Propaganda असा फोटो शेअर करत त्यांनी पाठिंबा दिला आहे. महेश लांडगे सोशल मीडियावर सक्रिय असतात.  

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख