कोरोनासाठी जगतापांचे २५ लाख, लांडगेंचे एक कोटी, तर बनसोडेंचे सव्वा कोटी

सध्या YCM हॉस्पिटलमध्ये खासगी कंपनीच्या मालकीचे हे मशीन आहे.
कोरोनासाठी जगतापांचे २५ लाख, लांडगेंचे एक कोटी, तर बनसोडेंचे सव्वा कोटी
Laxman Jagtap's Rs 25 lakh, Mahesh Landge's Rs 1 crore, Anna Bansode's Rs 1.25 crore for corona

पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून सव्वा कोटीचे सिटी स्कॅन मशिन शहरात महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बसविण्याचा प्रस्ताव पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना आज दिला. त्यामुळे कोरोना रुग्णांचे सध्या सशुल्क सिटी स्कॅन आता मोफत होणार आहे. 

दरम्यान, अण्णा बनसोडे यांच्या प्रस्तावामुळे पिंपरी चिंचवडमधील तीनही आमदारांच्या आमदार निधीतून कोरोनासाठी योगदान मिळाले आहे. प्रथम चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची रेमडेसिव्हीर इंजेक्शन शहरातील कोरोना रुग्णांना देण्यासाठी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी एक कोटी रुपये आपल्या आमदार निधीतून पालिकेच्या भोसरी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीकरिता दिले होते. त्यामुळे आमदार बनसोडे किती निधी देतात, याकडे शहराचे लक्ष लागले होते. त्यांनी कोरोना रुग्णांची नेमकी गरज ओळखून अचूक मदत केली आहे. आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च कोरोनावर करता येतो. मात्र, सिटी स्कॅन मशीन एक कोटी तीस लाख रुपयांचे असल्याने वाढीव खर्चासाठी सरकारची मंजुरी घेणार असल्याचे अण्णांनी ‘सरकारनामा'ला सांगितले.

कोरोनाग्रस्तांची फुप्फुसे किती संक्रमित आहेत,हे  CT स्कॅन मशीनद्वारे कळते. रुग्णाचा HRCT स्कोर किती आहे, त्यानुसार डॉक्टरांकडून रुग्णावर औषधोपचार केले जातात. कोरोना विषाणू फुफ्फुसावर आक्रमण करतो. त्यातून निमोनिया वाढल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो.

परिणामी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ होऊन तो अत्यवस्थ होतो. म्हणून रुग्णाचे फुफ्फुस किती संक्रमित आहे, याचा अचूक अंदाज CT स्कॅन मशीनच्या HRCT रिपोर्टद्वारे मिळतो. सध्या YCM हॉस्पिटलमध्ये खासगी कंपनीच्या मालकीचे हे मशीन आहे. तेथे बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क आहे, आता ते द्यावे लागणार नाहीत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in