लांडे म्हणतात धीर सोडायला लावणारे बजेट तर लांडगेंचा आत्मनिर्भतेचा दावा  - Lande says the budget is discouraging, while Lande claims self-sufficiency | Politics Marathi News - Sarkarnama

लांडे म्हणतात धीर सोडायला लावणारे बजेट तर लांडगेंचा आत्मनिर्भतेचा दावा 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील बजेट हे सर्वसामान्यांना धीर देणारे असेल,अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ते धीर सोडायला लावणारे ठरले आहे, असा हल्लाबोल माजी आमदार विलास लांडे यांनी केला तर, ते आत्मनिर्भर भारत घडवणारे आहे, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील बजेट हे सर्वसामान्यांना धीर देणारे असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ते धीर सोडायला लावणारे ठरले आहे, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यानी आज सादर झालेल्या केंद्रीय बजेटवर केला. तर, ते आत्मनिर्भर भारत घडवणारे आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

शतकाकडे वाटचाल सुरु केलेल्या पेट्रोल तसेच डिझेलवरील केंद्रीय कर कमी करून कोरोनाने होळपणाऱ्या जनतेला केंद्र दिलासा देईल, असे वाटले होते. पण, उलट एक नवा कर बजेटमध्ये लादून आणखी इंधन दरवाढ करण्यात आल्याबद्दल लांडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडणार असून त्यात सर्वसामान्यांची आणखी परवड होणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

त्यात ते म्हणतात, प्राप्तीकर मर्यादा वाढेल, अशी आशा पगारदारांना होती. ती न वाढल्याने प्रामाणिक कर भरणाऱ्या या चाकरमान्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. मध्यमवर्गावर संक्रात आली आहे. दुसरीकडे, मात्र भांडवलदारांचे हित पाहिले गेले आहे. विकायला काढलेल्या सरकारी कंपन्या तथा उपक्रमातून त्याला स्पष्ट दुजोरा मिळतो आहे. सगळ्यांचा विश्वास असलेली एलआयसीचे खासगीकरण सुरु केले आहे. एकूणच भविष्यात देश हा अंबानी आणि अदानीसारखे उद्योगपतीच चालवतील की काय, अशी शंका या बजेटमधून येऊ लागली आहे.

महेश लांडगे यांनी, मात्र देशातील सर्वच घटकांतील नागरिकांना आत्मनिर्भर बनवणारे हे बजेट असल्याचे म्हटले आहे.  ते पत्रकात म्हणतात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक ठेवला आहे. त्याच विचाराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आरोग्य, संरक्षण, उत्पादन आदी क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने भरघोस मदत केली आहे. 

केंद्रस्थानी शेतकरी; आत्मनिर्भर भारताचे बजेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशंसा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. शेतकरी व आत्मनिर्भर भारत मिशन केंद्रस्थानी असलेल्या या अर्थसंकल्पामुळे देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. हा अर्थसंकल्प नव्या भारताचा आत्मविश्वास वाढविणारे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना काळामध्ये हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे व्हिजन आहे. देशातील शेतकरी त्याच्या केंद्रस्थानी आहे. शेतकरी हिताच्या अनेक तरतुदी यामध्ये आहेत. त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर जोर देण्यात आला आहे. बाजार समित्यांना अधिक सक्षम करण्याची तरतूद आहे. यावरून हा अर्थसंकल्प शेतकरी आणि देशातील गावांचे प्रतिनिधित्व करणारे असल्याचे दिसते.  

नव्या भारताचा आत्मविश्वास वाढविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, देशातील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. युवकांना अनेक संधी उपलब्ध होतील. असे अर्थसंकल्प खूप कमी पाहायला मिळतात. अनेक आव्हाने असूनही सरकारने अधिक पारदर्शक अर्थसंकल्प सादर करण्यावर सुरूवातीपासून जोर देण्यात आला.

महिलांचे जीवन सुखद बनविण्यासाठी त्यांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन रोजगार निर्मितीसाठी चांगले वातावरण तयार होणार आहे. कोरोना काळातील आत्मनिर्भर भारत मिशनला अधिक वेगाने पुढे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन, राज्यमंत्री अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमचे अभिनंदनही केले. 

राहूल गांधी यांच्याकडून टीका

काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ''मोदी सरकार लोकांच्या हातात पैसे ठेवायला विसरले आहे. भारताची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हातात देण्याची त्यांची योजना आहे,'' असा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.  
 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख