कृष्णप्रकाशांची मोठी कारवाई : वेश्‍या व्यवसाय चालविणारे हॉटेल सहा महिन्यांसाठी सील  - Krishnaprakash's big action : Hotel running prostitution sealed for six months | Politics Marathi News - Sarkarnama

कृष्णप्रकाशांची मोठी कारवाई : वेश्‍या व्यवसाय चालविणारे हॉटेल सहा महिन्यांसाठी सील 

उत्तम कुटे 
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

अशी कठोर कारवाई शहरात प्रथमच झाली आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची अवैध धंद्याविरुद्धची मोहीम सुरुच असून त्यात त्यांनी आज (ता. 17 डिसेंबर) अशा अनैतिक व्यापारात गुंतलेल्या एका हॉटेलला जबर तडाखा दिला. वेश्‍याव्यवसाय चालत असलेले आयटी पार्क हिंजवडीतील ग्रॅन्ड मन्नत नावाचे हे हॉटेल त्यांनी सहा महिन्यांसाठी सील केले. अशी कठोर कारवाई शहरात प्रथमच झाली आहे. 

दुसरीकडे आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या अवैध धंद्याविरुद्धच्या कडक मोहिमेमुळे त्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी शहरातून आपला बाडबिस्तारा गुंडाळून तो दुसरीकडे हलवण्यास सुरवात केली आहे. 

वेश्‍या व्यवसायासारखा अनैतिक व्यापार चालणारे ठिकाण सर्वाधिक काळासाठी सील करण्याची कारवाई कृष्णप्रकाश यांनी करून असे धंदे करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. आतापर्यंत फक्त काही दिवसांपुरती अशी कारवाई आणि तीसुद्धा पुण्यात झाली होती. मात्र, सर्वात कठोर ती आता पिंपरी-चिंचवडमध्येही होण्यास सुरूवात झाली आहे. 

आगामी काळात अशा अवैध व्यवसायातून जमवलेली मालमत्ताही सील करण्याचे संकेतही त्यांच्याकडून मिळाले आहेत. आयटी पार्कमध्ये असे अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात यापूर्वी सुरू होते. 

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली ग्रॅन्ड मन्नतमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु होता. त्याबाबत माहिती मिळताच पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनीट क्रमांक चारने तेथे ता. 28 सप्टेंबर रोजी छापा टाकून चार तरुणींची सुटका केली होती. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी हे हॉटेल सील करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज ते सील करण्यात आले.

हद्दीतील अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी अशीच कारवाई करणार असल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. त्यासाठी मटका, गुटखा, गावठी दारु, वेश्‍या व्यवसाय अशा बेकायदेशीर धंद्याबद्दल माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख