आमदार बनसोडेंचे ‘टेन्शन’ घालवण्यासाठी जयंत पाटलांची पिंपरी भेट! 

या वेळी दोन तास बंद दाराआड चर्चा झाली.
Jayant Patil visited disgruntled MLA Anna Bansode in Pimpri
Jayant Patil visited disgruntled MLA Anna Bansode in Pimpri

पिंपरी  ः पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात झालेल्या गोळीबाराच्या खळबळजनक घटनेनंतर तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बनसोडेंची शनिवारी (ता. १० जुलै) भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. (Jayant Patil visited disgruntled MLA Anna Bansode in Pimpri)

या प्रकरणात दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्ह्यांत आमदार बनसोडे यांच्या पुत्राला दीड महिना तुरुंगात काढावे लागल्याने ते आतापर्यंत तणावात होते. या काळात पक्षाकडून मदत व विचारपूस न झाल्याने बनसोडे व त्यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नाराज होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत पिंपरी चिंचवड पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही त्यांना करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदारांपैकी बनसोडे यांच्या रुपाने फक्त एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पिंपरी चिंचवडच्या आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता पुन्हा आणण्यासाठी पक्ष आपल्यामागे ठामपणे उभा असल्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार बनसोडे यांना या भेटीत दिला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे व आमदार बनसोडे यांच्यात या वेळी दोन तास बंद दाराआड चर्चा झाली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज (ता. १० जुलै) दुपारी बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालयात आले. याच कार्यालयात १२ मे रोजी गोळीबार झाला होता. तानाजी पवार या पालिकेचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाने तो केला होता. त्यावेळी आमदारांच्या एका कार्यकर्त्याच्या प्रसंगावधनतेमुळे ते या गोळीबारातून बचावले होते. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या पवारला आमदारांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला होता. त्यामुळे त्यांच्यासह आमदारांचे पुत्र सिद्धार्थ याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेच्या पंधरा दिवसांनंतर सिद्धार्थला अटक होऊन दीड महिना जेलमध्ये काढावा लागला होता. 

सिद्धार्थ याला नुकताच (ता. ८ जुलै) जामीन मिळाला. त्यानंतर आमदार बनसोडे काहीसे चिंतामुक्त झाले होते, त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्षांनी भेट घेऊन दोन महिन्यांपूर्वीच्या गोळीबाराच्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. राज्यात सत्ताधारी व गृहखाते पक्षाकडे असूनही प्रत्यक्ष विचारपूस आणि मदत न झाल्याने बनसोडे व त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते काहीसे नाराज होते. त्यातून चुकीचा संदेश गेल्याने ही नाराजी पाटील यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. नाराजी झटकून पुन्हा कामाला लागण्याचा सल्ला पाटील यांनी बनसोडे यांना दिला. पोलिसांकडून योग्य ते सहकार्य न मिळाल्याची तक्रार आमदार बनसोडे यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com