पावसाळा सुरु झाल्यानंतर जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदार पोसण्यासाठीच

नदीपात्राजवळील रहिवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी आल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाचे आता वरातीमागून घोडे काढले आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदार पोसण्यासाठीच
Pimpri-Chinchwad, Municipal Corporation .jpg

पिंपरी : पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढण्याचे करण्यात येणारे काम दरवर्षीच्या नित्यनेमाप्रमाणे यावर्षीही पावसाळ्याच्या तोंडावर व तो सुरु झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात सुरु झाले आहे. जलपर्णीचा त्रास संपल्यानंतर व ती न काढताही पावसाळ्यात अशीच वाहून जाणार असल्याने नदीपात्राजवळील रहिवाशांच्या आरोग्यासाठी हे काम नसून कंत्राटदाराच्या भल्याकरिता असल्याचा आरोप नदीप्रेमींनी केला आहे. (Jalparni removal work started after the onset of rains) 

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे साई फ्रेट प्रा. लि या कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडूने ते पूर्ण झाले नाही. दरम्यान, नदीपात्राजवळील रहिवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी आल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाचे आता वरातीमागून घोडे काढले आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी पाच ठेकेदारांना नव्याने काम देण्यात आले आहे. त्यावर चार कोटी रुपये खर्च होणार आहे. त्याला मंजुरी देण्याचा विषय या आठवड्याच्या बुधवारी (ता. १६ जून ) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला आहे. 

दुसरीकडे पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे नद्या प्रवाही होऊन त्यात जलपर्णी आपोआप वाहून जाणार आहे. परिणामी जलपर्णी न काढताही हे चार कोटी रुपये कंत्राटदारांच्या खिशात जाणार आहेत. जलपर्णी काढण्याचे काम दिलेल्या पूर्वीच्या ठेकेदाराने ते पूर्ण काम न करताही त्याने सव्वा कोटीचे बिल पालिकेला दिले आहे. पूर्वी तीन नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी एकच कंत्राटदार होता. आता ते पाच केल्याने त्याचीही चर्चा आहे.

दरवर्षी पावसाळा येण्याची वाट जलपर्णी काढण्यासाठी पाहिली जाते. तर, हे काम दिलेला ठेकेदार तो त्याअगोदर म्हणजे जलपर्णीमुळे डासांचा त्रास होणाऱ्या हिवाळ्यात व नंतरच्या उन्हाळ्यात ती कधी काढतच नाही. पावसाळा सुरु होताच हे जुजबी काम करून तो पालिकेकडून पैसे उकळतो. त्याबद्दल पर्यावरण व नदीप्रेमी नेहमीच तक्रार करतात. पण, त्याची दखलच घेतली जात नाही. यावर्षीही पावसाळा सुरु झाल्यानंतर पूर्वीच्या ठेकेदाराने काम व्यवस्थित व पूर्णपणे न केल्याने आता चार कोटी रुपयांची ही जलपर्णीची पाच पॅकेज पाचजणांना देण्यात आली आहेत. त्यातील इंद्रायणी नदीसाठी एक, तर बाकीचे चार कंत्राटदार हे मुळा व पवना नदीतील जलपर्णी काढणार आहेत. या पाच कामांपैकी दोन कामांची ठेकेदार फर्म एकच असून ती राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची आहे.  

त्याजोडीने पवनेसाठी आणखी एका ठेकेदारालाही २५ लाखाचे हे काम देण्यात आले आहे. त्याला मान्यता देण्याचा विषयही बुधवारच्या स्थायीसमोर आहे. दुसरीकडे शहरातील तिन्ही नद्यांतील जलपर्णी बहूतांश कायमच आहे. ती काढण्याचे थातूरमातूर काम करण्यात आले आहे. पावसाळा सुरु झाल्यावरच जलपर्णी काढण्याची जाग पालिकेला अचानक कशी येते, त्यापूर्वीच म्हणजे हिवाळा व उन्हाळ्यात तिचा प्रत्यक्ष सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असताना ती काढली का जात नाही, यातून ती फक्त ठेकेदार पोसण्याकरिता टक्केवारीसाठीच ही कामे पावसाळ्याच्या तोंडावर व पावसाळ्यात केली जात असल्याचा आरोप नदीप्रेमी राजू सावळे यांनी केला आहे. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in