नगरसेविकाचा डेंगीने बळी घेतल्याने पिंपरीत डास व जलपर्णीचा मुद्दा ऐरणीवर - The issue of mosquitoes and water hyacinth in Pimpri is on the rise due to dengue victim of the corporator | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नगरसेविकाचा डेंगीने बळी घेतल्याने पिंपरीत डास व जलपर्णीचा मुद्दा ऐरणीवर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांची बदली होऊन त्याजागी राजेश पाटील आल्यानंतर सत्ताधारी व प्रशासनात गेल्या साडेचार वर्षात प्रथमच वाकडे आले आहे. त्यात आता डेंगीने त्यांच्या नगरसेविकेचा बळी गेल्यामुळे त्यांच्या हातात आय़ते कोलीत प्रशासनाविरोधात मिळाले आहे.

पिंपरीः डेंगीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) तरुण नगरसेविका अर्चना बारणे यांचा बळी घेतल्याने शहरातील डास व नद्यांतील जलपर्णी व प्रदूषणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.त्यावरून सत्ताधारी भाजप येत्या स्थायी समितीच्या व पालिका सभेतही प्रशासनाची कोंडी करण्याची दाट शक्यता आहे. (The issue of mosquitoes and water hyacinth in Pimpri is on the rise due to dengue victim of the corporator)

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांची बदली होऊन त्याजागी राजेश पाटील आल्यानंतर सत्ताधारी व प्रशासनात गेल्या साडेचार वर्षात प्रथमच वाकडे आले आहे. त्यात आता डेंगीने त्यांच्या नगरसेविकेचा बळी गेल्यामुळे त्यांच्या हातात आय़ते कोलीत प्रशासनाविरोधात मिळाले आहे. त्यामुळे ते त्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, स्थायीची आजची (ता.१४) साप्ताहिक सभा याच कारणामुळे स्थगित करण्यात आली.मात्र, स्थायीच्या पुढील बैठकीत (ता.१६) आणि या महिन्याच्या पालिका सभेतही (ता.२०)यावरून गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाने गेल्या वर्षभरात पालिकेतील तीन नगरसेवकांचा बळी घेतला आहे.त्याजोडीने आता डेंगीनेही नगरसेवक शिकार होऊ लागले आहेत. या चार नगरसेवकांत दोन सत्ताधारी,तर तेवढेच विरोधी बाकावरील राष्ट्रवादीचे आहेत.

शहरातून वाहणाऱ्या पवना,इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांत प्रचंड जलप्रदूषणामुळे दरवर्षीच जलपर्णीची हिरवळ तयार होते. उद्योगनगरीत कारखान्यांसाठी स्वतंत्र एसटीपी नसल्याने त्यांचे रसायनमिश्रीत पाणी तसेच नदीत सोडले जात आहे. त्याजोडीने शहरातील सांडपाणीही गटारातून नदीत मिसळत आहे. त्याचा फटका नदीशेजारच्या रहिवाशांना बसतो आहे. जलपर्णीमुळे डासांचा सामना त्यांना करावा लागतो.डेंगी,मलेरियाला ते बळी पडतात. हा त्रास वर्षांनूवर्ष कायम आहे. पालिका दरवर्षी वरवरची मलमपट्टी करते.कोट्यवधींच्या खर्चाचे टेंडर फक्त ठेकेदाराच्या भल्यासाठी व  टक्केवारीकरिता काढले जाते. कोट्यवधी रुपये अदा केले जातात.पण जलपर्णी तशीच राहते. परिणामी डासांची उत्पत्ती व त्यामुळे मलेरिया व डेंगी हे दुष्टचक्र सुरुच राहते. यावर्षीही पाच कोटी रुपयांची निविदा त्यासाठी काढण्यात आली आहे. यावर्षीही तशीच परिस्थिती आहे. पूर्णपणे जलपर्णी काढली गेलेलीच नाही.पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ते पावसाळा सुरु झाला,तरी सुरुच आहे. नदीशेजारच्या भागाखेरीज शहराच्या इतर भागातही अस्वच्छतेमुळे, साचलेल्या डबक्यांमुळे या समस्येचा सामना रहिवाशांना करावा लागतो आहे.

श्रीमंत पिंपरी पालिकेची गरज नसताना जलपर्णीच नाही,तर इतर विषयांवरही फक्त टक्केवारीसाठी अनाठायी खर्च सुरुच आहे. त्यातून यापूर्वीच्या स्थायीच्या तीन सलग बैठकांत शाळा बंद असूनही तेथे वॉटर फिल्टर,कूलर बसविणे,तेथे फर्निचर तयार करणे आणि अंगणवाड्यात स्वच्छता किट वाटणे असे कोट्यवधी रुपयांचे विषय मान्यतेसाठी आले होते. बुधवारच्या (ता.१४) स्थायीच्या सभेतही असाच एक प्रस्ताव होता.तीन नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी एक नाही,तर पाच पॅकेजस करण्यात आली आहे. नदीकिनाऱ्यावरून या कामाची पाहणी करता येणे शक्य आहे. तरीही त्यासाठी ड्रोनव्दारे करून  करदात्यांच्या पैशाच्या लाखा रुपयांच्या नाहक उधळपट्टीचा हा अभिनव फंड्याचा प्रस्ताव अजेंड्यावर होता. पण,ही सभा येत्या शुक्रवारपर्यंत तहकूब झाल्याने तो आता दोन दिवस लांबणीवर पडला आहे. पण,तो परवा मंजूर होईल,अशीच चर्चा ऐकायला मिळाली आहे.

दरम्यान,नगरसेविकेचा बळी डेंगीने जाऊनही शहरात यावर्षी डेंगीचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती पालिकेतून बुधवारी (ता.१४) सरकारनामाला देण्यात आली.त्यातून त्यांच्या लेखी रुग्णच नाही,तर बळी जाणे ही खूप दूरची गोष्ट आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी निष्क्रिय व अकार्यक्षम अधिकाऱ्याकडे असल्याने ही आफत पालिकेवर आली आहे. त्यामुळे कोरोना काळात टीका झाल्यानंतर त्यांच्याकडची कोरोनाची जबाबदारी काढण्यात आली आहे. राजकीय साट्यालोट्यातून ते या पदावर आहेत. खमके, कार्यक्षम आयुक्त पाटील यांच्या पाटीलकीच्या कारभारात या समस्येचीही तड लावतील,अशी आशा आता शहरवासियांना आहे.
 

हेही वाचा..

कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख