लॅंडमाफियांच्या कारनाम्यांंना अटकावासाठी कृष्ण प्रकाश यांची ही शक्कल!

परवानगीशिवाय गुन्हा दाखल न करण्याची तंबी
लॅंडमाफियांच्या कारनाम्यांंना अटकावासाठी कृष्ण प्रकाश यांची ही शक्कल!
krushanprakash1.jpg

पिंपरी : जमिनीच्या वादांबाबत पोलिस निरीक्षक अथवा सहायक आयुक्तांनी परस्पर गुन्हा दाखल करू नये, असा आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. संबंधित तक्रारीची उपायुक्तांनी खातरजमा केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह परिसरातील जमिनीला चांगला भाव आला आहे. अशातच जागा बळकाविण्यासह अतिक्रमण करणे तसेच चुकीच्या पद्धतीने जमिनीची खरेदी-विक्री करण्याचे उद्योग वाढले आहेत. जमिनींच्या व्यवहारावरून होणाऱ्या वादाच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासह त्याच्या चौकशीसाठी काही निरीक्षक व सहायक आयुक्त अधिक उत्सुक असल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले. जमिनीचा वाद दिवाणी स्वरूपाचा असतानाही त्याला फौजदारी स्वरूप दिले जाते. यासह नियमानुसार मिटणारे प्रकरण पोलिसांनी अधिक गुंतागुंतीचे केल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या.

त्यामुळे आयुक्‍तांनी अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले आहे. यापुढे जमिनींच्या वादाबाबत एखादे प्रकरण आल्यास ते प्रकरणी दिवाणी की फौजदारी स्वरूपाचे आहे, हे नमूद करून त्याबाबतचा अहवाल निरीक्षकांनी सहायक आयुक्तांमार्फत उपायुक्तांकडे पाठवावा. त्यानंतर संबंधित प्रकरणाची खातरजमा करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय उपायुक्तांनी घ्यावा. जमिनीच्या वादाबाबतच्या प्रकरणात निरीक्षक अथवा सहायक आयुक्तांनी परस्पर गुन्हा दाखल करू नये, असे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधितांना दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in