भाजपने केला उपमहापौरपदाचा फिरता रंगमंच; चार वर्षांत पाच जणांना वाटले पद
Hirabai Ghule .jpg

भाजपने केला उपमहापौरपदाचा फिरता रंगमंच; चार वर्षांत पाच जणांना वाटले पद

चार वर्षांत पाच उपमहापौर झाल्याने हे पद म्हणजे फिरता रंगमंच झाल्याची चर्चा शहरात आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद दादांच्या (भोसरीचे आमदार महेश लांडगे) भोसरीकडे गेल्यानंतर उपमहापौरपद भाऊंच्या (चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप) समर्थकाकडे आले आहे. येत्या मंगळवारी (ता. २३ मार्च) त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, चार वर्षांत पाच उपमहापौर झाल्याने हे पद म्हणजे फिरता रंगमंच झाल्याची चर्चा शहरात आहे.

२०१७ ला प्रथमच सत्तेत आल्यानंतर भाजपच्या पहिल्या उपमहापौर होण्याचा मान शहरातील तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शैलजा मोरे यांना मिळाला होता. तर, पाचव्या आणि शेवटच्या उपमहापौरही महिला आणि त्या ही पिंपरी मतदारसंघातीलच असणार आहेत. दरम्यान, महापौर माई ढोरे या चिंचवड, तर या महिन्यात पाच तारखेला स्थायी समिती अध्यक्ष म्हणून निवडून आलेले अॅड नितीन लांडगे हे भोसरी मतदारसंघातील आहेत. तर, उपमहापौर हे तिसरे मोठे पद आता पिंपरीत गेल्याने पदवाटपाचा समतोल भाजपने राखला आहे.

उपमहापौरपदासाठी नानी ऊर्फ हिराबाई घुले यांना संधी देण्यात आली आहे. त्यासाठी भाऊंनी शब्द टाकल्याचे समजते. गेल्या चार वर्षात त्यांना एकही पद देण्यात आले नव्हते. एवढेच नाही, तर त्यांच्या बोपखेल भागाला सुद्धा ही संधी प्रथमच मिळते आहे. काहीशा दुर्लक्षित असा हा भाग पदवाटपात राहिला होता. ती उणीव आता भरून निघाली. त्याबद्दल घुले यांनी पक्षाचे आभार मानले. या संधीचे सोने करीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामा'ला अर्ज दाखल केल्यानंतर दिली.

केशव घोळवे यांनी राजीनामा दिल्याने उपमहापौरपदासाठी येत्या मंगळवारी निवडणूक होत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेविका घुले यांनी शुक्रवारी सायंकाळी (ता. १९ मार्च) उमेदवारी दाखल केली. पालिकेतील स्पष्ट बहूमत पाहता आणि सांगली वा जळगाव पॅटर्नची अजिबात शक्यता नसल्याने भाजपचाच उपमहापौर होणार हे निश्चीत आहे. तरीही विरोधी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला आहे. स्थायी अध्यक्षपद निवडणुकीत याच महिन्यात पाच तारखेला पराभूत झालेले पंकज भालेकर यांनाच उपमहापौरपद निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in