बारणेंनी दिल्या लक्ष्मण जगतापांना शुभेच्छा; डॉ. कोल्हे - लांडगे आले हातात हात घालून 

बारणे आणि जगताप यांच्यात गेली कित्येक वर्षांपासून दुरावा आहे.
Happy Diwali to Laxman Jagtap from MP Shrirang Barne
Happy Diwali to Laxman Jagtap from MP Shrirang Barne

पिंपरी : राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील दोन्ही खासदार, तीनही आमदार आणि दिग्गज नेते प्रथमच एकत्र हास्यविनोद करताना दिसले. निमित्त होते दिवाळी फराळाचे. राजकारण सोडून इतर सर्व अगदी वैयक्तिक चर्चाही या वेळी झाल्याने या नेत्यांतील कटूता दिवाळीने काहीशी कमी केल्याचे पहायला मिळाले. 

दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळ फराळ उपक्रमात शहरातील सारे नेते झाडून एकत्र आले होते. या प्रसंगी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे जात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि भोसरीचे भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे हे हातात हात घालूनच या कार्यक्रमाला आले. 

ही दोन्ही दुर्मिळ दृश्‍ये पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. कारण, बारणे आणि जगताप यांच्यात गेली कित्येक वर्षांपासून दुरावा आहे. तो गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मिटविण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर युतीत पुन्हा दुरावा आल्याने बारणे आणि जगताप यांचे मनोमिलनही तात्पुरते ठरले. दिशा फाउंडेशनच्या या कार्यक्रमात ते पुन्हा नुसते एकत्रच आले नाही, तर त्यांनी एकमेकांना दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्याने त्यांच्या समर्थकांना हायसे वाटले. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठिंबा देत महेश लांडगे यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्या निवडणुकीत लांडगे यांनी आढळराव यांना भोसरी मतदारसंघातून मताधिक्‍क्‍यही मिळवून दिले होते. त्यामुळे कोल्हे-लांडगे यांचे एकत्र येणे महत्त्वाचे ठरते. 

राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे माजी खासदार गजानन बाबर, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पालिकेतील भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, कॉंग्रेसचे सचिन साठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी या उपक्रमात सामील झाले होते. त्यांना 
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले "शिवगंध' हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. 

प्रास्ताविक दिशा संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर, तर सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. बाजीराव लोखंडे यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com