भाऊंचा कित्ता दादांनी गिरवला...आता अण्णा काय करणार? 

आपल्या २०२१-२२ वर्षाच्या आमदार निधीतील एक कोटी रुपये कोरोनासाठी देण्याचा प्रस्ताव त्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना मंगळवारी (ता.२० एप्रिल) दिला आहे.
भाऊंचा कित्ता दादांनी गिरवला...आता अण्णा काय करणार? 
Laxman Jagtap, Mahesh Landage .jpg

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या आमदार निधीतील २५ लाख रुपये  रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी दिल्यानंतर शहरातील भाजपचेच दुसरे आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी आता त्यांचा कित्ता गिरवला आहे. आपल्या २०२१-२२ वर्षाच्या आमदार निधीतील एक कोटी रुपये कोरोनासाठी देण्याचा प्रस्ताव त्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना मंगळवारी (ता.२० एप्रिल) दिला आहे.

भाऊंनी २५ लाखाची औषधे महापालिकेच्या पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाला देऊ केली आहेत तर दादांनी भोसरीतील पालिकेच्याच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीकरिता एक कोटी रुपये देऊ केले आहेत. हे दोन्ही आमदार शहराचे कारभारी आहेत. दादा हे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपचे आजी, तर भाऊ हे माजी अध्यक्ष आहेत. नुकतीच राज्य सरकारने आमदार निधीतून कोरोनावर खर्चाची मर्यादा दुप्पट म्हणजे एक कोटी रुपये केली. त्यानंतर दादांनी पूर्ण एक कोटी रुपये दिले. त्यामुळे आता शहरातील तिसरे आमदार राष्ट्रवादीचे पिंपरीचे अण्णा बनसोडे हे आपल्या आमदार निधीतून किती रक्कम व कधी कोरोनाकरिता देतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोसरी येथील महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी लांडगे यांनी मंगळवारी केली. याबाबत  दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, भोसरीचे नवीन रुग्णालय हे पूर्ण कोविडसाठी तयार केले गेले आहे. गंभीर तसेच ऑक्सिजन आवश्यक असलेले १२० रुग्ण तेथे दाखल आहेत. मात्र, तेथे ऑक्सिजन पुरवठा हा नियमित होत नाही. त्यामुळे ७१० एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून मोठी आर्थिक लूट सुरु आहे. ते तासाला १ हजार ते ३ हजार रुपये घेत आहेत. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ही त्याहून गंभीर बाब आहे, अशी संतप्त टीका जगताप यांनी केली.

मृतांचे कुटुंबिय किंवा नातेवाईक दुःखात असल्यामुळे ते आपली होणारी ही आर्थिक लूट गपगुमान सहन करत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. त्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णवाहिका त्याब्यात घेऊन त्यांचे संचलन करण्याची सूचना जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा आरटीओंना पत्र देऊन केली. त्यामुळे मृताचे कुटुंबिय व नातेवाईकांना दिलासा मिळेल,असे ते म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in