शरद पवारांवरील टीकेमुळे मामेसासरे-भाचेजावयात रंगली जुगलबंदी - Former MLA Vilas Lande criticizes MLA Mahesh Landage | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांवरील टीकेमुळे मामेसासरे-भाचेजावयात रंगली जुगलबंदी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी बालेवाडी क्रीडा संकुल उभारले आहे.

पिंपरी : बालेवाडी स्टेडियमच्या (Balewadi Stadium) सिंथेटिक ट्रँकवर गाड्यांचा ताफा गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विरोधकांची टिका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यातही क्रिडा क्षेत्रात शून्य योगदान असलेल्यांनी स्वतःची कुवत पाहून बोलावे. नको तिथे आपली बुध्दी पाजळण्यास तोंडघशी पडावे लागेल, असा हल्लाबोल भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी मंगळवारी केला. (Former MLA Vilas Lande criticizes MLA Mahesh Landage) 

हेही वाचा : फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच; त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल

पवारांसह इतर दोन मंत्र्यांच्या मोटारी या ट्रँकवर उभ्या करणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी या घटनेचा सोमवारी एक खेळाडू म्हणून निषेध केला होता. पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) भाजपची ही निषेधाची पहिली प्रतिक्रिया होती. त्याचा समाचार लगेचच लांडे यांनी घेतला. पवारांवरील टीकेला सणसणीत उत्तर देणारी शहर राष्ट्रवादीतून आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. मामेसासरे, भाचेजावई असलेले लांडगे, लांडे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. लांडगे हे भाजपचे शहराध्यक्षही आहेत. तर, लांडे यांचे या पदासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. गत विधानसभेला लांडगेंनी लांडेंचा पराभव केलेला आहे. 

क्रिडा विश्वाला गती देणारा व्यक्ती क्रिडाविषयक नियमांचे उल्लंघन कसे करू शकेल, अशी विचारणा करीत हा निषेध म्हणजे स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणण्याचाच प्रकार आहे, असा हल्लाबोल लांडे यांनी पवारांवर टीका करणाऱ्या भाजपवर केला. पायाच्या जखमेमुळे परवानगीनंतर पवारसाहेब व मंत्र्यांच्या मोटारी ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणून या प्रकाराचा निषेध म्हणजे राजकीय सूडबुध्दीतून सूचलेले विकृत शहाणपण आहे. 

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

अशा सूडबुध्दीची कीव येते. क्रीडा क्षेत्रातील तज्ञ मानून निषेध व्यक्त करत स्वतःचे अज्ञान याव्दारे चव्हाट्यावर आणले आहे, अशी सडकून टीका लांडेंनी लांडगेंवर त्यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य करीत केली. पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी बालेवाडी क्रीडा संकुल उभारले आहे. असे त्यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर असलेले लांडे यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख