पिंपरी : कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी (ता. 11 नोव्हेंबर) दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद शहर कॉंग्रेसमध्ये गुरुवारी (ता. 12 नोव्हेंबर) लगेच उमटले.
पक्षाच्या महिला शहराध्यक्ष, सेवादल अध्यक्षांसह पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवून दिले. ते देताना त्यांनी पक्षश्रेष्ठींवर आरोप केले आहेत. शहर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना श्रेष्ठी डावलत असल्याने शहरात हे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. परिणामी शहरात कॉंग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, सेवा दलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, भोसरी ब्लॉकचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. शहराला पक्षश्रेष्ठींनी नेहमीच डावलले असून शहराला न्याय न दिल्यातून आपण राजीनामे देत असल्याचे या पाच पदाधिकाऱ्यांनी एकत्रच दिलेल्या सामूहिक राजीनामापत्रात म्हटले आहे. न्याय देण्याच्या भूमिकेत पक्षश्रेष्ठी दिसत नाहीत.
ही बाब वेळोवेळी निदर्शनास आणून देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. अशी खंत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर साठे यांना संधी न मिळाल्याने शहर कॉंग्रेसमध्ये हे राजीनामासत्र सुरु झाले आहे.
साठे यांनी आतापर्यंत पक्ष संघटनेत केलेले काम पाहता त्यांना प्रदेश नेतृत्वाने विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने शहर कॉंग्रेसचे आणखी काही पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामे देतील, असे एका प्रमुख पदाधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे शहरात अगोदरच क्षीण झालेल्या कॉंग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या शहरात पक्षाचा आमदार सोडा, एक नगरसेवकही नाही. गेल्या पंचवार्षिकला असलेल्या बहुतांश सर्व नगरसेवकांनी गत महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2017 च्या पालिका निवडणुकीत, तर पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. परिणामी शहरात पक्षसंघटनेची वाढ ताकदीअभावी खुंटली आहे. त्यात आता शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच राजीनामा दिल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

