भाजपच्या राजवटीत पहिला घोटाळा उघड, बोगस एफडीआरप्रकरणी गुन्हा दाखल 
Pimpri Chinchwad Municipal Corporation .jpg

भाजपच्या राजवटीत पहिला घोटाळा उघड, बोगस एफडीआरप्रकरणी गुन्हा दाखल 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बहूचर्चित एफडीआर घोटाळ्याप्रकरणी पालिकेची फसवणूक केल्याबद्दल एक नव्हे, तर पाच गुन्हे पोलिसांनी पालिकेच्या पाच ठेकेदारांविरुद्ध (ता. २६ जानेवारी ) रोजी दाखल केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बहूचर्चित एफडीआर घोटाळ्याप्रकरणी पालिकेची फसवणूक केल्याबद्दल एक नव्हे, तर पाच गुन्हे पोलिसांनी पालिकेच्या पाच ठेकेदारांविरुद्ध (ता. २६ जानेवारी ) रोजी दाखल केले. त्यामुळे ठेकेदारांतच नव्हे, तर पालिका वर्तूळात  व त्यातही स्थापत्य विभागाच्या अधिकारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे. 

या घोटाळ्यात ठेकेदारांना पालिका अधिकाऱ्यांनी व त्यातही स्थापत्य विभागातून मदत मिळाल्याचा दाट संशय आहे. यानिमित्ताने भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी पालिकेतील या पहिल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

पालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या कामांसाठी सबंधित ठेकेदारांकडून बॅंक गॅरंटी आणि एफडीआर (फिक्स डिपॉजिट रिसीट) घेतली जाते. कामाच्या विशिष्ट टक्के प्रमाणात ती असते. कोट्यवधी रुपयांची पालिकेची कंत्राटी घेणाऱ्या ठेकेदारांकडून अशी लाखो रुपयांची सुरक्षा अनामत, बॅंक गॅरंटी आणि एफडीआर घेतली जाते. अशी कोट्यवधी रुपयांची अनेक कामे घेतलेल्या १८ ठेकेदारांची त्यांच्या बॅंकेची दिलेली ही एफडीआरच बोगस असल्याचे आढळून आले आहे. 

त्याविरुद्ध विरोधकांनी मोठा आवाज उठविल्यानंतर या ठेकेदारांना पालिकेने काळ्या यादीत टाकले. या घोटाळ्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचाही हात असण्याची शक्यता असल्याने याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली.

त्यामुळे नाईलाजाने त्याप्रकरणी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यासाठी आदेश द्यावे लागले अन पोलिसांत पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. ती आल्यानंतर तिचा अभ्यास करून काही दिवसांनी काल हा चिटिंग आणि फोर्जरीचा गुन्हा दाखल झाला. 

स्थापत्य विभागातील लेखा अधिकारी रमेशकुमार जोशी (वय ५८) यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसर्स पाटील अॅन्ड असोसिए़टचे मालक सुजीत सुर्यकांत पाटील (वय २६,रा.भोसरी), कृती कंस्ट्रक्शनचे विशाल हनुमंत कुर्राडे (वय २९,रा. पिंपरी), एस.बी. सवईचे संजय बबन सवई (रा. थेरगाव), वैदेही कंस्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय ४७,रा. भोसरी) आणि डी. डी. कंस्ट्रक्शनचे दिनेश मोहनलाल नवानी (वय २८,रा. पिंपरी) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पाटील यांनी पाच, कुर्राडेंनी चार, सवईंनी सात, मळगेंनी बारा, तर नवानी यांनी तब्बल २४ कंत्राटे पालिकेकडून घेतलेली आहेत. या तसेच काळ्या यादीत टाकलेल्यांसह अनेक ठेकेदारांचा पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी असलेल्या अर्थपूर्ण सबंधातून हा लाखो रुपयांचा एफडीआर घोटाळा झाल्याचा संशय आहे. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in