सत्ताधारी भाजपच्या विरोधामुळे आयुक्तांनी 24 तासांत फिरवला आपलाच निर्णय  - Due to the opposition of the ruling BJP, the commissioner reversed his decision within 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

सत्ताधारी भाजपच्या विरोधामुळे आयुक्तांनी 24 तासांत फिरवला आपलाच निर्णय 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता सरकारी यंत्रणांनीच वर्तवली असून त्याला पुन्हा वेगाने वाढत चाललेल्या रुग्णसंख्येने दुजोरा मिळत आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा घेतलेला निर्णय 24 तासांतच मागे घेण्याची नामुष्की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर आज (ता. 21 नोव्हेंबर) आली. 

मुंबई, ठाणे वगळता राज्यातील शाळा सोमवारपासून (ता. 23 नोव्हेंबर) सुरु करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवडमधील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी शुक्रवारी (ता. 20 नोव्हेंबर) घेतला होता. मात्र, पालिकेतील सत्ताधारी भाजपने या निर्णयाला तीव्र विरोध केल्याने आयुक्तांना तो आज मागे घ्यावा लागला. 

आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन शाळा कधी सुरू करायच्या, त्याबाबत निर्णय घेऊ, असे पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी "सरकारनामा'ला सांगितले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता सरकारी यंत्रणांनीच वर्तवली असून त्याला पुन्हा वेगाने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येने दुजोराही मिळत आहे. त्यामुळे शाळा लगेचच उघडण्याचा निर्णय धोकादायक ठरणार असल्याचे ढाके म्हणाले. 

गणेशोत्सवानंतर या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे दिवाळीनंतरही ती वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून शाळा उघडण्याचा निर्णय लगेच घेऊ नये, असे सांगत महापौर माई ढोरे यांनीही आयुक्तांच्या या निर्णयाला विरोध केला होता. स्थानिक पातळीवर या संदर्भात निर्णय घ्यावा, असे शासकीय आदेशात नमूद केले असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात येत आहे, असे महापौर ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, दिवाळीनंतर हिवाळ्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने आयुक्तांच्या या निर्णयावर सडकून टीका झाली होती. तो मागे घ्यावा, या साठी दबाव आला होता. 

पुण्यातील शाळाही 13 डिसेंबरपर्यंत बंद राहणार 

पुणे शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी (ता. 21 नोव्हेंबर) दिली. 

येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा बंदच राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याचे महापौर मोहोळ यांनीही येत्या 13 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

येत्या 13 डिसेंबर रोजी कोरोनाचा महामारीच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पालकांशी चर्चा करून आणि तत्कालीन परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर मोहोळ यांनी या वेळी सांगितले. तोपर्यंत पुणे शहरातील महापालिकेच्या सर्व आणि खासगी शाळाही बंदच ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख