पिंपरीत महापौर बदलाची चर्चा : लक्ष्मण जगताप कोणाला देणार संधी?  - Discussion of change of mayor in Pimpri: To whom will Laxman Jagtap give a chance? | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरीत महापौर बदलाची चर्चा : लक्ष्मण जगताप कोणाला देणार संधी? 

पितांबर लोहार 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

आगामी महापौरसुद्धा चिंचवड मतदारसंघातीलच असणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शहरात महापौर बदलाची चर्चा सुरू झाली आहे. कारण, भारतीय जनता पक्षाने त्यांना ठरवून दिलेला एक वर्षाचा कालावधी 22 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदी संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांची नेत्यांकडे उठबस सुरू झाली आहे. 

दरम्यान, भाजपचे पहिले दोन महापौर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांगडे यांच्या गटाचे झाले आहेत. त्यानंतर विद्यमान महापौर या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील आहेत. त्यामुळे आगामी महापौरसुद्धा चिंचवड मतदारसंघातीलच असणार आहे. पण, लक्ष्मण जगताप कोणाला संधी देतात, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाने अधिकाधिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यात महापौर आणि उपमहापौर पदांचाही समावेश आहे. त्यामुळे निश्‍चित कालावधी पूर्ण झाल्यावर महापौर, उपमहापौरांना राजीनामा द्यावा लागणार, हे ठरलेले आहे.

मात्र, मुदतीपूर्वीच हिंगे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा पक्षाने घेतला. त्याची कारणे काहीही असली तरी, बदला-बदलीच्या चर्चेला उधाण आले आहे. कारण, महापौरपदी उषा ढोरे अद्याप कार्यरत आहेत. पुढील महिन्यात त्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण करणार आहेत. 

महापौर व उपमहापौरपदी अनुक्रमे ढोरे व हिंगे यांची गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवड झाली होती. त्यापूर्वी 2017 च्या निवडणुकीनंतर महापौरपदी नितीन काळजे व उपमहापौरपदी शैलेजा मोरे यांना संधी मिळाली. सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि महापौर, उपमहापौरपदी अनुक्रमे राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांना संधी मिळाली.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांना तीन महिन्यांचा अधिक काळ मिळाला. त्यानंतर त्यांनाही राजीनामा द्यावा लागला आणि ढोरे व हिंगे यांची वर्णी लागली. आता "पक्षाचा आदेश असल्याने राजीनामा दिला,' असे हिंगे सांगत आहेत. पण, महापौर बदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. 

सत्ता मिळवून देणाऱ्या नगरसेवकाला संधी 

पालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी-2022 मध्ये होईल. त्यापूर्वी किमान एक महिना अगोदर आचारसंहिता लागू होऊ शकते. म्हणजेच निवडणुकीसाठी अजून चौदा महिने बाकी आहेत. विद्यमान महापौरांचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण असल्याने आगामी महापौरांना तेरा महिन्यांचा कालावधी मिळेल. महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी विकास कामांना गती देणारा व प्रशासनावर पकड मिळवू शकणारा नगरसेवकच महापौरपदी विराजमान होण्याची शक्‍यता आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख