फडणवीसांचा अमित गोरखेंना फोन, "दुपारी तुझ्याकडे जेवायला येतोय'! 

स्नेहभोजन केल्यानंतर त्यांनी दीड तास शहरासह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.
फडणवीसांचा अमित गोरखेंना फोन, "दुपारी तुझ्याकडे जेवायला येतोय'! 
Devendra Fadnavis calls Amit Gorkhe, "I am coming to you for lunch in the afternoon

पिंपरी : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 23 जानेवारी) पुणे जिल्हा दौऱ्यात शाही हॉटेलऐवजी भारतीय जनता पक्षाच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याच्या घरी पिंपरी-चिंचवडमध्ये साधे शाकाहारी जेवण करणे पसंत केले. त्यामुळे हा पदाधिकारी भारावून गेला. मटकी, मेथीची भाजी आणि भाकरी असा फडणवीसांच्या जेवणाचा मेनू होता. 

भाजपच्या प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक व मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत फडणवीस आले होते. त्यानंतर सायंकाळी ते राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेले. सकाळी मुंबईहून निघताना त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे भाजपचे प्रदेश सचिव आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे या आपल्या विश्वासातील तरुण पदाधिकाऱ्याला फोन केला. दुपारी जेवायला येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

भोसरीतील मेळाव्याला जाण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी ते व माजी मंत्री गिरीश महाजन हे गोरखे यांच्या घरी दीड वाजता गेले. गोरखे कुटुंबाबरोबर स्नेहभोजन केल्यानंतर त्यांनी दीड तास शहरासह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते भोसरीला आणि तेथून राळेगणसिद्धीला रवाना झाले. 

फडणवीसांच्या भेटीने गोरखे कुटुंब भारावून गेले होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन त्यांनी आम्हाला दिलेला वेळ हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला, अशी भावना गोरखे यांनी या भेटीनंतर "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 

या वेळी फडणवीस आणि महाजन यांना त्यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचारधन अर्थात त्यांच्या साहित्याचा संच भेट दिला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in