कोरोनाचा परिणाम; पिंपरीच्या उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध...

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा झालेला उद्रेक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार महिला व ज्येष्ठ असल्याने उमेदवारी मागे घेतल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील आणि पक्षाचे पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सरकारनामाला सांगितले.
कोरोनाचा परिणाम; पिंपरीच्या उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध...
Hirabai Ghule

पिंपरीः  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादीने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपच्या नानी उर्फ हिराबाई घुले या बिनविरोध उपमहापौर झाल्या. महापौरपदाच्या फिरत्या रंगमंचात त्या गेल्या चार वर्षातील भाजपच्या पाचव्या उपमहापौर ठरल्या आहेत. गेल्या चार वर्षात हिराबाई व त्या प्रतिनिधित्व करीत असलेल्या बोपखेल भागाला पालिकेत कुठलेही पद मिळालेले नव्हते.

ऊसतोड कामगार पुत्र व कामगार नेते केशव घोळवे यांना फक्त चार महिने या पदावर ठेवण्यात आले. त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. दरम्यान, माघारच घ्यायची होती, तर अर्जच कशाला दाखल करायचा, त्यामुळे शेवटच्या वर्षात राष्ट्रवादीने हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याची चर्चा या निवडणुकीनंतर पालिकेत ऐकायला मिळाली. मात्र, शहरात कोरोनाचा झालेला उद्रेक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार महिला व ज्येष्ठ असल्याने उमेदवारी मागे घेतल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील आणि पक्षाचे पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सरकारनामाला सांगितले. 
  
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले आहे. तसेच महिलांना संधी देण्याचे पक्षाचेही धोरण आहे. त्यातूनच उमेदवारी मागे घेतली,असे या दोघांनीही स्पष्ट केले. पण, तसे होते, तर मग अर्जच कशाला दाखल केला? त्यामुळे शेवटच्या वर्षी हात दाखवून राष्ट्रवादीने अवलक्षण करून घेतले, अशी चर्चा पालिकेत ऐकायला मिळाली.कोरोना आज, काल व परवा वाढलेला नसून त्याने गेल्या महिन्यापासून शहरात उचल खाल्ली आहे. अर्ज दाखल केला त्या दिवशी म्हणजे १९ मार्चलाही  तो आजच्याएवढाच होता, अशी कुजबूज राष्ट्रवादीतच सुरु होती.  

सध्या महापौर माई ढोरे या शहराचे कारभारी आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या,तर स्थायी समिती अध्यक्ष अॅड.नितीन लांडगे हे शहराचे दुसरे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांचे पाठीराखे आहेत.सभागृहनेतेपदी जुने भाजपाई नामदेव ढाके आहेत. तर, नव्या उपमहापौर नानी या दोन्ही कारभाऱ्यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे अकरा महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर कारभाऱ्यांनी पालिकेतील पद वाटपात काहीसा समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आतापर्यंत पदे न मिळालेले अनेक नगरसेवक नाराज असून ती त्यांनी उघडपणे व्यक्तही केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in