आता महापौरांनाही हवा आहे पगार अन् पेन्शन! - Demand for salary and pension in mayor Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आता महापौरांनाही हवा आहे पगार अन् पेन्शन!

उत्तम कुटे 
शुक्रवार, 16 जुलै 2021

महापालिका सभागृहाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष सभागृहामध्ये घ्यावे, 

पिंपरी : राज्यातील महापालिकांचे महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना दरमहा वेतन, तर महापौरांना निवृत्तीवेतन (पेन्शन) देण्याची मागणी राज्यातील महापौरांच्या २२ व्या ऑनलाईन महापौर परिषदेत गुरुवारी (ता. १५) करण्यात आली. त्यासाठी महानगरपालिका अधिनियमात दुरुस्ती करण्याची विनंती परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. Demand for salary and pension in mayor Parishad

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. कोरोनामुळे दीड वर्षानंतर ती झाली. मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर या महापौर परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. ती तासभर चालली. परिषद ऑनलाईन होऊनही राज्यातील निम्याच महापौरांनी त्याला हजेरी लावली.

कोरोनाच्या प्रार्दुभाव कमी झाला असल्याने महापालिका सभा ऑनलाईन न घेता त्या पूर्वीप्रमाणे सभागृहात घेण्याची आवश्यकता आहे, असे मत पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी  व्यक्त केले.

पालिका निवडणूकांना काही महिन्यांचा कालावधी उरलेला असल्याने नगरसेवकांना त्यांचे मत मांडण्यासाठी, चर्चा करण्याकरिता सभागृहाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष सभागृहामध्ये सहभाग घेऊन करावे, यासाठी परिषदेतील उपस्थित सर्व महापौरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते यांना वेतन आणि महापौरांना पेन्शन आदी विषय बैठकीच्या अजेंड्यावर होते. तर, कोरोनाचा विषय ऐनवेळी घेण्यात आला.

अजितदादांच्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांना हसू आवरता आले नाही!

२००६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या महापौर असलेल्या मंगला कदम यांनी महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर अद्याप हा मान शहराकडे आलेला नाही. सध्याच्या महापौर ढोरे परिषदेच्या सदस्या आहेत. सद्यस्थितीत शहराला मागणीच्या तुलनेने कमी लसींचा पुरवठा होत आहे, याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने मुबलक प्रमाणात ती उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली.  पिंपरी चिंचवडने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य दिले आहे.  

वैद्यकीय अधिकारी, फ्रंटलाईन वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध वयोगटातील नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, वयोवृध्द व जर्जर अवस्थेतील नागरिक, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, तृतीयपंथी यांचेकरीता विशेष लसीकरण मोहिम राबवून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, जळगाव, अकोले, अमरावती आदी पालिकांच्या महापौरांनी या ऑनलाईन महापौर परिषदेच्या बैठकीत सहभाग नोंदवला. प्रास्ताविक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केले.  परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी आभार मानले.

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख