सायबर हल्ल्याच्या आडून पाच कोटींचा विमा लाटण्याचा डाव 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर २६ फेब्रुवारीला सायबर हल्ला झाला होता.
सायबर हल्ल्याच्या आडून पाच कोटींचा विमा लाटण्याचा डाव 
Sima Salve .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पावर नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यातून ५ कोटी रुपयांची विमा रक्कम लाटण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका सिमा सावळे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर २६ फेब्रुवारीला सायबर हल्ला झाला होता. या घटनेप्रकरणी ८ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात टेक महिंद्रा कंपनीने पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ते कसे झाले त्याबाबत तीन आठवड्यात समाधानकारक खुलासा कंपनीला करता आलेला नाही. त्यामुळे नुकसानीच्या रकमेचा विमा लाटण्याचा कंपनीचा डाव आहे, असा आरोप सावळे यांनी केला आहे.

 हे सर्व प्रकरण खूपच गोलमाल असून त्यात कुठेतरी पाणी मुरते आहे, असे त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे विमा लाटण्याचा हा बनाव नाही ना याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे पत्राव्दारे केली आहे. त्यात त्या म्हणाल्या की स्मार्ट सिटी प्रकल्प सांभाळणार्‍या टेक महिंद्रा कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्व्हर  खंडणीच्या हल्ल्याचा बळी पडले आहेत. 

तक्रारीनुसार हल्लेखोरांनी बिटकॉइन्समध्ये खंडणी द्यावी, अशी मागणी केली आहे. तर, या हल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असा दावा पालिकेने केला आहे. अशा स्थितीत कंपनीने पाच कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज नेमका कोणत्या आधारावर केला, त्याची वांरवार मागणी करूनही खुलासा झालेला नाही. अशा स्थितीत नुकसानीचा हा दावा फोल वाटतो आहे. निव्वळ विमा लाटण्यासाठीच तो केला असावा, असा दाट संशय आहे. म्हणून सायबर हल्ल्यानंतरचा हा बनाव आहे.

धक्कादायक प्रकार त्यात पालिका प्रशासन कंपनीला उघडउघड पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकूणच स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ या प्रकरणावर कंपनीचीच वकिली करीत आहे, हे, तर आणखी धक्कादायक आणि संशयास्पद असल्याचे साळवे म्हणाल्या आहेत. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in