चंद्रकांत पाटलांची बदनामी दोघांना पडली महागात  - Crime against both in defamation case of Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांची बदनामी दोघांना पडली महागात 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आयुब जमादार याने चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र आपल्या फेसबुक अकाउंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले.

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक आणि विडंबन करणारी छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) आज दाखल करण्यात आला. दरम्यान, अशा गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करता येत नसल्याने तो करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

आयुब जमादार आणि कीर्तीसिंह कोरेकर पाटील (पत्ता माहीत नाही) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब जमादार याने चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र क्रॉप करून आपल्या फेसबुक अकाउंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले. कोरेकर पाटील याने ते शेअर केले होते. तपासासाठी न्यायालयाची परवानगी मागितली असल्याचे तपास अधिकारी आणि निगडी पोलिस ठाण्याचे फौजदार पी. डी. आरदवाड यांनी सांगितले. 

हेही वाचा : लक्ष्मण जगताप गटाचा महेश लांडगे समर्थकांना अल्टिमेटम 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी आणि भोसरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी आजची सभाही तहकूब केल्याने संतापलेल्या भाऊ समर्थक (चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप) सदस्यांनी अध्यक्षांसह प्रशासनालाही आता अल्टिमेटम दिला. दरम्यान, स्थायी समितीची सभा तहकूब होण्याची आठवडाभरात हॅट्‌ट्रीक झाली आहे. 

सभा स्थगितीच्या सत्रांमुळे ऐन सणासुदीत शहरवासियांचे ज्वलंत प्रश्न कसे व कुठे मांडायचे, अशी संतप्त विचारणा उपस्थित भाऊ समर्थक सदस्यांनी केली. मागील आठवड्याची बुधवारची स्थायी समितीची साप्ताहिक बैठक तहकूब झाली होती. तर, या आठवड्याची सभाही कोरम नसल्याचे कारण देऊन परवा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे त्या सभेत भाऊ समर्थकांनी राडा केला होता. पाण्याचा काचेचा ग्लास त्यावेळी भिरकारवून देण्यात आल्याने तो फुटला होता. आज, अध्यक्ष संतोष लोंढे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सभा तहकुबीसाठी दिले. 

बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली असून त्याबाबत काहीच उत्तर न आल्याने आजची सभा येत्या बुधवारपर्यंत तहकूब करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, शशिकांत कदम या भाऊ समर्थकांचा संताप झाला. बारणे यांनी सभा घेण्यासाठी बुधवार अल्टिमेटम दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख