कृष्णप्रकाशांकडून पूरगस्त भागाला वाढदिवसाची लाखमोलाची भेट

कृष्णप्रकाश हे आपल्या वाढदिवशी भेटवस्तू, हारतुरे, पुष्पगुच्छ घेत नाहीत. त्याऐवजी ते पुस्तके स्वीकारतात.
Sarkarnama (19).jpg
Sarkarnama (19).jpg

पिंपरी : व्यायाम व वाचनप्रेमी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश Krishnaprakash यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त (ता.१५) दोन लाख ३२ हजार रुपयांचा एक हजार ७२ प्रेरणादायी पुस्तकांचा खजिना पूरग्रस्त चिपळूणच्या दोन वाचनालयांना नुकताच (ता. २३) भेट म्हणून दिला. आपल्या वाढदिवशी भेट म्हणून फक्त पुस्तके स्वीकारून ती पुन्हा भेट देण्याचा आयुक्तांचा हा उपक्रम इतरांनीही प्रेरणा घेण्यासारखा असल्याने त्याचे मोठे कौतूक होत आहे.

देशाच्या नागरी सेवेतील अल्ट्रामॅन व आर्यनमॅन कृष्णप्रकाश हे आपल्या वाढदिवशी भेटवस्तू, हारतुरे, पुष्पगुच्छ घेत नाहीत. त्याऐवजी ते पुस्तके स्वीकारतात. ही प्रथा पिंपरी-चिंचवडमध्येही त्यांनी पुढे सुरु ठेवली आहे. गेल्या महिन्यात राज्यात राज्यात व त्यातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापूराचा मोठा फटका बसला. त्यात चिपळूण येथील १५६ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या ग्रंथालयाच्या दहा हजार पुस्तकांचा चिखल होऊन अपरिमित नुकसान  झाले. कारण २२ व  २३ जुलै असे दोन दिवस हे वाचनालय पाण्यातच होते.

चिपळूणातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या  दुसऱ्या वाचनालयाचीही अशीच अवस्था या जलप्रलयात झाली. तेथील  १८ हजार पुस्तके खराब झाली. या वाचनालयांना गेल्या १६ वर्षात बसलेला हा दुसरा असा फटका होता. २००५ च्या महापूरात टिळक वाचन मंदिरातील चाळीस हजार पुस्तकांचा चिखल झाला होता. ५८ हजारातील १८ हजार त्यावेळी वाचली होती. त्यानंतर संचालक मंडळाने दारोदाऱी फिरून पुस्तके जमा करून पुन्हा आपला हा अमूल्य खजिना पाऊण लाख केला होता. 

राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं ; म्हणाले...
यावर्षी २२ जुलैला, तर २००५ पेक्षा तिप्पट पाणी आले आणि त्यात दहा हजार पुस्तकांचा पुन्हा बळी गेला. अश्मयुगीन हत्यारांपासून मराठा कालीन हत्यारांपर्यंतची शस्त्रास्त्रे, इसवीसनपूर्व ते आंग्ल काळापर्यंतची नाणी, ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या, भांडी, मूर्ती असे संग्रहालयही या पाण्यात गेले. कोकणी माणूस कुठल्याही संकटात डगमडत नाही. हार मानत नाही. आत्महत्या, तर अजिबात करीत नाही. त्यांनी आपले हे उत्कृष्ट संग्रहालय पुन्हा उभे करण्याचा निर्धार केला. त्याबाबत पुस्तक व वाचनप्रेमी कृष्णप्रकाश यांना समजताच त्यांनी आपला यावेळचा वाढदिवस या सत्कामी लावण्याचे ठरवले.  पुष्पगुच्छ, केक वा इतर कुठलीही भेट घेणार नसल्याचे पुन्हा जाहीर करून फक्त प्रेरणादायी पुस्तके स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या आवाहनाला त्यांच्या हितचिंतकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल दोन लाख ३२ हजार रुपयांची एक हजार ७२ पुस्तके त्यांना भेट मिळाली. त्यांनी नुकतीच ती चिपळूणच्या दोन्ही वाचन मंदिरांचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्त केली.

या आगळ्या भेटीबद्दल फक्त कृतज्ञ आहोत, अशी भावना देशपांडे यांनी सरकारनामाकडे व्यक्त केली. कारण आमचं आभाळंच फाटलं होतं. पण, यामुळे आमचे ग्रंथालय संदर्भ पुन्हा समृद्ध झाले. एक सजग पोलिस अधिकारी काय करू शकतो, याचा प्रत्यय आला. त्यांच्या अमूल्य भेटीतून सकारात्मक मानसिक ऊर्जा मिळाली, असे ते म्हणाले. तर, बातम्यांतून या हानीबाबत कळले आणि खारीचा वाटा उचलायचे ठरवले,असे कृष्णप्रकाश यांनी सांगितले. कारण वाचनातून मी घडलो आहे.  पुस्तके काही घेत नाही, तर उलट देतात. लहानपणी ऐपत नसल्याने मित्रांकडे जाऊन ती वाचत होतो. म्हणून त्यातून काहीअंशी उतराई होण्यासाठी नुकसान झालेल्या वाचनालयांच्या या संपत्तीची फक्त थोडी भरपाई केली असे ते म्हणाले. ही त्यांची मदत कायमस्वरुपी राहणार आहे.
 Edited by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com