इंग्लडहून उद्योगनगरीत आलेल्या सातजणांना कोरोना.. प्रशासन चिंतेत - Corona to seven people from England who came to Pimpri Chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

इंग्लडहून उद्योगनगरीत आलेल्या सातजणांना कोरोना.. प्रशासन चिंतेत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 जानेवारी 2021

महिन्याभरात इंग्लडहून शहरात येऊन पन्नासजण पुन्हा शहराबाहेर (गावी) गेल्याने प्रशासनाची काळजी आणखी वाढली आहे.

पिंपरी  : अधिक वेगाने पसरणाऱ्या धोकादायक कोरोनाचा नव्याने प्रसार झालेल्या इंग्लडमधून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या सातजणांना तो झाल्याचे आढळल्याने पालिका प्रशासन काहीसे चिंतेत आहे. आणखी आठजणांचे हे अहवाल येणे बाकी असल्याने या चिंतेत भरच पडली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्याभरात इंग्लडहून शहरात येऊन पन्नासजण पुन्हा शहराबाहेर (गावी) गेल्याने प्रशासनाची काळजी आणखी वाढली आहे. आतापर्यंत अशा एकूण २६८ प्रवाशांचा शोध पालिकेने घेतला आहे. त्यातील १८८ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातील १७३ निगेटीव्ह, तर सातजण पॉझीटिव्ह आढळले.

आठजणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. काल शहरात एकूण १२० नव्याने कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ही ९६,७२८ झाली आहे. सध्या ५७९ रुग्ण रुग्णालयात  तर ९१८ घरी उपचार घेत आहेत. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्यामुळे शहरातील एकूण बळींची संख्या १७५७ वर गेली आहे.

हेही वाचा : मलिद्यासाठी प्राधिकरणाचे विलिनीकरण..भाजपचा आरोप 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापण्याचा उद्देश निम्माही सफल झाला नसताना त्याचे विलीनीकरण म्हणजे प्राधिकरणाच्या उद्देशाला हरताळ फासण्यासारखे आहे, अशी जळजळीत टीका पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपचे नेते नामदेव ढाके यांनी महाविकास आघाडी सरकारच्या संभाव्य प्राधिकरण विलीनीकरणावर केली आहे. स्थानिक भूमीपूत्रांच्या जमिनी व्यावसायिक आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नुकत्याच घेतलेल्या बैठकीत प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करण्यावर चर्चा केली.त्यावर विरोधी पक्ष भाजपकडून थेट टीका होणारे वक्तव्य आल्याने त्याला महत्व आहे.

शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनीपैकी ५० टक्के सुद्धा प्राधिकरण विकसित करु शकले नाही, तरीही विलिनीकरणाचा घाट कशाला ? असा रोकडा सवाल ढाकेंनी केला आहे. मोठे बिल्डर, व्यावसायिकांना हे भुखंड देऊन त्यातुन मलिदा खाण्यासाठीच हे विलिनीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्राधिकरणाच्या विकसित भागाबरोबर अविकसित भाग आणि त्यांचे आरक्षित भूखंडही तातडीने पालिकेकडे वर्ग करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख