पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन

मुख्य म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना त्यात पुढे केले गेले होते.
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन
Conspiracy to transfer Pimpri Chinchwad Police Commissioner Krishnaprakash

पिंपरी  ः अवघ्या दहा महिन्यांत अवैध धंदेमुक्त पिंपरी-चिंचवड करणारे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचे षडयंत्र रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. या कटात आयुक्तांच्या कारवाईने नाराज झालेले काही पोलिस अधिकारीही सामील असल्याची माहिती आहे. त्याला स्वतः आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दुजोरा दिला. (Conspiracy to transfer Pimpri Chinchwad Police Commissioner Krishnaprakash)

आयुक्तांवर गंभीर आरोप करून त्याद्वारे त्यांची बदली करण्याचा हा कट शहरातीलच एका हॉटेलात शिजल्याची माहिती हाती आली आहे. मुख्य म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना त्यात पुढे केले गेले होते. या कटाच्या अंमलबजावणीसही सुरुवात झाली होती. मात्र, तो शेवटास जाण्यापूर्वीच त्याचा सुगावा लागल्याने तो फसला. त्यामुळे आयुक्त आता सावध झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी सर्वांनाच सदैव दारे सताड उघडी होती. मात्र, आता त्याकरिता ते थोडी खबरदारी घेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर या षडयंत्राचा सुगावा लागताच त्यांनी त्याबाबत सविस्तर अहवाल राज्याच्या गृह विभागाला लगेच पाठवून देण्याची खबरदारी घेतली आहे.

आयुक्त कृष्णप्रकाश यांची पिंपरी-चिंचवडमधील कामगिरीही कणखर आहे. पिंपरीत रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी बेकायदेशीर धंद्याविरुद्ध आघाडी उघडली. अवैध धंद्यांची माहिती देण्याकरिता त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर केला. त्यांनी अवैध धंद्यांना चाप लावला. एवढेच नाही तर पारावर गांजाची चिलीम फुंकणेही बंद झाले. ढाब्यावर अवैधरित्या दारु मिळणेही थांबले. स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या कॉल गर्लच्या धंद्याला आळा बसला. एवढेच नाही, तर हे अवैध धंदे चालू असलेल्या पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या. या धंदेवाल्यांकडून हफ्ते घेत त्यांना अभय देणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याच केल्या नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाईही केली. 

चाकण आणि तळेगाव एमआयडीसीतील गुंडगिरीही आयुक्तांनी काहीशी नियंत्रणात आणली. एकूणच त्यामुळे बेकायदेशीर धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले. त्यांच्याजोडीने हे धंदे सुरु असलेली पोलिस ठाणी व तेथील अधिकाऱ्यांचे हफ्ते बंद झाले. त्याची परिणती म्हणून आयुक्तांचीच बदली करण्याचे षडयंत्र दुखावलेल्या या गटाने रचले. त्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात आयुक्तांच्या टेबलवर संविधान हे इतर पुस्तकांखाली ठेवून त्याचा अवमान केल्याची पहिली आरोळी ठोकण्यात आली. त्याविरोधात १२ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशाराही दिला. 

संविधान ठेवण्याचे व काढण्याचे काम आपण स्वतः करीत नसून ते कार्यालयीन कर्मचारी करतात, हे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, या कर्मचाऱ्याने जाडजूड संविधान खाली ठेवून त्यावर तुलनेने हलकी पुस्तके ठेवली होती. पण, हा आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी त्वरित टेबलावरील संविधान खालून काढून ते वर ठेवत षडयंत्र रचणाऱ्यांचा पहिला डाव हाणून पाडला. तसेच, कोरोना निर्बंध असतानाही आंदोलनाचा इशारा दिलेल्याला नोटीस बजावली. त्यामुळे आंदोलनाचा इशारा दिलेल्यांना आंदोलन स्थगितच नाही, तर ते रद्दच करावे लागले. 

संविधान अवमानाचा आरोप करून आंदोलनाचा इशारा दिलेली व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून आपल्याविरुद्ध कारवाई न होण्यासाठी त्याने हे ब्लॅकमेल केल्याचे आयुक्तांनी सांगितले. अशा व्यक्ती आणि काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना अवैध धंदेवाल्यांकडून मिळणारा मलिदा बंद झाल्याने त्यांनी ही अभद्र युती करून हे षडयंत्र रचले होते, असे त्यानंतर समजले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in