पिंपरी : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे पिंपरी-चिंचवडमधून खास अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे ते कुणा राजकीय व्यक्ती वा पक्षाने केले नसून शहराचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले आहे.
जगातील सर्वात खडतर अशी ट्रायलथॉन स्पर्धा जिंकून अल्ट्रामॅन हा किताब पटकावणारे देशाच्या नागरी सेवेतील आणि वर्दीतील ते पहिले अधिकारी आहेत.
बायडेन यांचे अभिनंदन करताना त्यांच्याबरोबरील हस्तांदोलनाचा फोटो कृष्णप्रकाश यांनी आपल्या "फेसबुक पेज'वर शेअर केला आहे. त्याखाली बायडेन यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
या संदर्भात कृष्णप्रकाश म्हणाले की, "जो बायडेन हे 2013 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. त्यात त्यांचा 24 जुलैला मुंबईत कार्यक्रम होता. त्यावेळी बायडेन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. ती यशस्वीरित्या पार पाडल्याने बायडेन यांनी मला व माझ्या टीमला बोलावून आमचे आभार मानले होते. त्यावेळचा हा फोटो आहे'
बावन्न वर्षीय कुप्रसिद्ध चंदनतस्कर वीरप्पन हा पंचविशीतील तरुणाएवढा फीट होता. तसा उल्लेख त्याच्यावरील वीरप्पन या पुस्तकात आहे. त्याला मारणारे के. विजयकुमार या अधिकाऱ्याने ते लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचून अल्ट्रामॅन स्पर्धेसाठी उद्युक्त झालो होतो, असे ही स्पर्धा 2018 ला जिंकल्यानंतर कृष्णप्रकाश यांनी त्यावेळी "सरकारनामा'ला सांगितले होते.
"आयपीएस कृष्णप्रकाश ठरले पहिले अल्ट्रामॅन' या मथळ्याखाली 25 जून 2018 रोजी सरकारनामाने याबाबत सचित्र वृत्त दिले होते. आयर्नमॅन हा किताबही 2017 मध्ये पटकावलेले कृष्णप्रकाश हे सर्वात फिट आयपीएस अधिकारी आहेत.

