गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी उचलले हे पाऊल

पोलिस खात्यात तीन प्रकारचे अधिकारी असतात.
गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी उचलले हे पाऊल
Commissioner Krishnaprakash gave important responsibilities to the new officers .jpg

पिंपरी : मोठा अनुभव लागणाऱ्या महत्वाच्या फिल्ड पोस्टिंगवर पिंपरी-चिंचवडमध्ये तुलनेने कमी अनुभवी, पण थेट एसीपी असलेल्या तरुण पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून शहराची कायदा व सुव्यवस्था एकप्रकारे तरुणाईच्या हातातच सोपविण्याचे धाडस पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले आहे. मात्र, ते करताना त्यांनी पारख व टेस्ट करूनच या अधिकाऱ्यांना रिझल्ट हव्या असलेल्या ठिकाणी पोस्टिंग देऊन मोठा विश्वास टाकला आहे.

स्वत केले, मग सांगतिले या न्यायाने प्रथम आयुक्तांनी शहरवासियांच्या नजरेत स्वत: खरे उतरण्याचा प्रयत्न केला. शहरातील सर्व अवैध धंदे त्यांनी बंद करून अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर आता त्यांनी थेट चार एसीपी असलेल्या तरुण अधिकाऱ्यांना महत्वाच्या विभागांवर संधी दिली आहे. पोलिस दलाचा कणा असलेल्या गुन्हा शाखेची धुरा त्यातील दोघांकडे देण्यात आली आहे. चौघांपैकी एक २०१४ च्या, तर बाकीचे त्याअगोदरच्या वर्षातील बॅचचे पोलिस अधिकारी (सहाय्यक पोलिस आयुक्त तथा पोलिस उपअधिक्षक) आहेत. त्यातून कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी तरुण अधिकारी फिल्डवर उतरवल्याचे दिसून येत आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले चाकण विभागाचे सहायक आयुक्त राम जाधव हे मार्च अखेरीस सेवानिवृत्त झाले. ही संधी साधून आयुक्तांनी आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करून हा धाडसी प्रयोग केला आहे. जाधवांच्या जागी तशाच अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी कोल्हापूर येथून आलेल्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्याकडे चाकण विभागाची जबाबदारी सोपवली. चाकण एमआयडीसीत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न मोठा आहे. जोडीने गुन्ह्यांचे प्रमाणही तेथे अधिक आहे. त्यामुळे तेथे कट्टे यांची कसोटी लागणार आहे. मात्र, तेथे पाठवण्यापूर्वी शहरात त्यांना इतर ठिकाणी काम देऊन पारखण्यात आले होते. 

शहराचा मध्यवर्ती, झोपड्यांचा अधिक भाग व संवदेनशील अशा पिंपरी विभागातही वरचेवर कायदा व  सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे तेथे संयमाने परिस्थिती हाताळणारा अनुभवी अधिकारी हवा, असा निकष यापूर्वी लावला जात होता. मात्र, तेथेही आयुक्तांनी तरुण असलेल्या सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांची नियुक्ती केली.
 

तसेच, यापूर्वी गुन्हे शाखेत देखील शहराची नस माहिती असलेल्या सहायक आयुक्तांची वर्णी लावली जात होती. मात्र, तेथे देखील कृष्णप्रकाश यांनी शहरासाठी नवखे डॉ. प्रशांत अमृतकर व श्रीकांत डिसले यांना संधी दिली. आता गुन्हे शाखेची विविध पथके या तरुण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. एकंदरीत कृष्णप्रकाश यांनी तरुण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जास्त विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे.

मोठा अनुभव हवा असलेल्या महत्वाच्या पदांवर तुलनेने कमी अनुभवी व तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती का केली अशी विचारणा केली असता कृष्णप्रकाश यांनी समर्पक असे उत्तर 'सरकारनामा'शी बोलतांना दिले. ते म्हणाले, मला रिझल्ट हव्या असलेल्या ठिकाणी या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच त्या करण्यापूर्वी या अधिकाऱ्यांना इतर ठिकाणी पोस्टिंग देऊन तेथील रिझल्ट पाहिल्यानंतर त्यासाठी त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. अमृतकर हे शहरात एकदम नवे असले, तरी त्यांनी येथे येण्यापूर्वी पंढरपूर येथे आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. तो विचारात घेऊन त्यांना गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. 

पोलिस खात्यात तीन प्रकारचे अधिकारी असतात. एक जे सुरवातीला कडक असतात, मात्र नंतर दबाव वा इतर कारणामुळे नंतर मऊ होतात. तर, दुसऱ्या संवेदनशील अधिकाकार्यांचीही अशीच गत नंतर होते. म्हणजे उकळत्या पाण्यात टाकल्यावर एखादी वस्तू जशी मऊ होते, तशी त्यांनी अवस्था होते. तर, तिसरे हे कॉफीबिनसारखे असतात. उकळत्या पाण्यात टाकूनही ते मऊ न होता पाण्याला आपल्यात मिसळून घेऊन एक चांगली चव देतात. माझे तरुण एसीपी हे तिसऱ्या प्रकारात मोडतात, असे त्यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in