धान्यात भेसळ करताय...? २५ लाख रुपये द्या... : ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत  

त्यामुळे व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 धान्यात भेसळ करताय...? २५ लाख रुपये द्या... : ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत  
collected ransom in Pimpri  the name of various organizations

पिंपरी  ः  संघटनांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून हफ्तेवसुलीचे प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार दिवसांत असे दोन गुन्हे दोन टोळ्यांविरुद्ध दाखल झाले आहेत. त्यात मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनचा राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारी, ज्योत्स्ना पाटील यांच्यासह या संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना वाकड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तर सोमवारी (ता. १३ सप्टेंबर) अशाच एका हफ्तेखोर कार्यकर्त्याची चिखली पोलिसांनी धरपकड केली. त्याच्या दोन फरारी साथीदारांचा शोध सुरु आहे. (collected ransom in Pimpri  the name of various organizations)

या दोन्ही प्रकारांत खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात असाच तिसरा खंडणीचा गंभीर प्रकार चाकणमध्ये सोमवारी (ता. १३ सप्टेंबर) घडला. तेथेही चार महिलांचा समावेश असलेल्या अशाच एका खंडणीखोर टोळीने चक्क नगरसेवकाकडूनच १५ लाख खंडणी मागितली. त्यातील दोन महिला, एक पत्रकार व इतर दोघे अशा पाच जणांची धरपकड करण्यात आली आहे. या टोळीने संबंधित नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देण्याची तयारी केली होती. त्यातून बदनामीची भीती दाखवत ही तक्रार न देण्यासाठी त्यांनी १५ लाख रुपये मागितले होते. एकूणच गुंडांपेक्षा अशाप्रकारे खंडणी तथा हफ्ते वसुलीचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यात तरुणींचा समावेश चिंताजनक आहे.

रहाटणी येथील बालाजी ट्रेडर्स या होलसेल दुकानात ११ सप्टेंबर रोजी भ्रष्टाचार निवारणवाले आयकार्ड गळ्यात लटकावत गेले. धान्यात भेसळ करता, असे सांगून त्यांनी मालकाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर साडेआठ हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने हिसकावले होते. या टोळीच्या वाकड पोलिसांनी तातडीने मुसक्या आवळल्या. 

असाच खंडणीचा दुसरा गुन्हा चिखली पोलिस ठाण्यात काल नोंद झाला. तेथेही अशाच एका त्रिकूटाने एका भांड्याच्या दुकानदाराला अशीच बदनामीची भीती दाखवली. तसेच, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल करू, असे धमकावत एक लाख रुपये मागितले. त्यातील चाळीस हजार रुपये त्यांनी उकळले. या प्रकरणी अक्षय रामा चव्हाण (वय २६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार संतोष रामा चव्हाण आणि सचिन गायकवाड हे फरारी झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले. 

हे त्रिकूट गेली १३ दिवस जैन नाकोडा मेटल्स या भांड्याच्या दुकानाचे मालक अजय राजेंद्र जैन (रा. चिखली) यांना धमकावत होते. तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो आहे. त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करतो, असे हे टोळके या दुकानदाराला म्हणाले. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तुझ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू, तुझे दुकान चालू देणार नाही, अशी धमकीही या त्रिकूटाने जैन यांना दिली होती. त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी चाळीस हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा वीस हजारांची मागणी आरोपींनी केली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारू, असे धमकावले होते. त्यामुळे घाबरून ते शेवटी पोलिसांत काल गेले. अटक खंडणीखोराला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिल्याची माहिती तपासाधिकारी कुमठकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in