आम्ही खुनशीने वागलो असतो, तर शिवसेना संपली असती   - Chandrakat Patil criticizes Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही खुनशीने वागलो असतो, तर शिवसेना संपली असती  

उत्तम कुटे 
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत गेले म्हणजे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असं नाही.

पिंपरी : वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत गेले म्हणजे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असं नाही. अमितभाईंच्या पायगुणाने ते यायचं असेल, तर येईलही, असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये केला.

नुकतीच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभूणे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शहा यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पराचा कावळा करण्याची सवय असलेल्या शिवसेना व त्यातही संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा आपापल्या परीने जमेल तसा सोईस्कर विपर्यास केला. खरं, बोललं की झोंबतं. अमित शहा खरं बोलले, म्हणून ते झोंबले, असा पलटवार त्यांनी शिवसेनेवर केला. 

गेले चौदा महिने महाविकास आघाडीचा ज्या खूनशीने कारभार सुरु आहे, तसं आम्ही आमच्या सत्ताकाळात राज्यात वागलो असतो, तर शिवसेना संपली असती, असे पाटील म्हणाले. 

हे ही वाचा...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सरकार घाबरलं अन् आनंदी फडणवीस! 

मनसेचा राम कदमांना धक्का 

अमित शाहांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचं सरकार जावं असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, अमित शहांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केली नसून त्यांना सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यामुळे राऊत शिवसेनेला संपवणार आहेत, असा चिमटा त्यांनी राऊतांना काढला. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नसल्याचं पाटील म्हणाले. 

अमित शहा काय म्हणाले होते... 

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. बाळासाहेब ठाकरेंच्या तत्त्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती. बंद दाराआड आम्ही कधीच काही करत नाही. जे काही असेल ते जनतेसमोर असते, असे अमित शहा म्हणाले होते. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख