जगतापांना सोबत घेऊन काम करण्याचा लांडगेंच्या समर्थकास चंद्रकांदादांचा सल्ला

चंद्रकांत पाटलांचा हा सल्ला खूप काही सांगून गेला आहे.
Chandrakant Patil. jpg
Chandrakant Patil. jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे दोन्ही नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना सोबत घेवून शहरातील विकासकामे मार्गी लावा, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना आज दिला. याव्दारे त्यांनी शहर भाजपमध्ये एकोप्याचा संदेश दिला आहे.

चंद्रकांत पाटलांचा हा सल्ला खूप काही सांगून गेला आहे. कारण सध्या शहरात दोन्ही कारभारी आमदारांचे गट आहेत. या गटबाजीतूनच मावळत्या स्थायी समितीत अनेकदा गोंधळच नाही, तर राडा झालेला आहे. गत स्थायीचे अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे हे दादा समर्थक होते. त्यांच्या वर्षभराच्या काळात दादांच्या भोसरी मतदारसंघातीलच शेकडो कोटी रुपयांची कामे प्राधान्याने स्थायीने मंजूर केली आहेत. 

त्यावेळी चिंचवड मतदारसंघातील कामे होत नसल्याचा वा ती अडवून ठेवली जात असल्याचा आरोप जगतापसमर्थक स्थायी सदस्यांनी केला होता. हा वाद स्वतः चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारभारी भाऊ व दादांची मुंबईत बैठक घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला होता. महापौर, सभागृहनेते व स्थायी अध्यक्ष या तीन महत्वाच्या पदांवरून या दोन गटांत मोठी रस्सीखेच गेल्या चार वर्षात पहायला मिळालेली आहे. 

सध्याच्या महापौर माई ढोरे या लक्ष्मण जगताप यांच्या पाठीराख्या, तर, स्थायीचे अध्यक्ष नितीन लांडगे हे महेश लांडगे समर्थक आहेत. हे शेवटचे वर्ष असून ११ महिन्यांनी पालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे पक्षात एकोप्याचा संदेश चंद्रकांत पाटलांनी महेश लांडगे समर्थक स्थायी अध्यक्ष नितीन लांडगेंना दिला आहे. ५ तारखेला निवडून आल्यानंतर त्यांनी आज प्रदेशाध्यक्षांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमुळेच ही संधी मिळाली असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने शहरातील विकासकामे मार्गी लावून पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे नव्या स्थायी अध्यक्षांनी यावेळी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com